चंद्रपूर / प्रवीण गोंगले /---
वन विभागा मार्फत उत्तम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून
वनविभागाची सेवा ही ईश्वरीय सेवा आहे. वनपाल, वनरक्षक व वनमजूरांचे सर्व
प्रश्न न्यायपूर्ण मार्गाने सोडविण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार
असल्याची ग्वाही अर्थ, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय
अधिवेशनात ते बोलत होते.
चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या
अधिवेशनाचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन
करुन उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास
महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष चंदनसिह चंदेल हे होते. वनबल प्रमुख
ए.के.निगम, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, अप्पर मुख्य
वनसंरक्षक पा.ना.मुंडे, अप्पर मुख्य वनसंरक्षक के.एस.खवारे, मुख्य
वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जे.पी.गरड,
संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष अजय पाटील व स्वागत अध्यक्ष विशाल मंत्रीवार
यावेळी उपस्थित होते.
ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, टिम फॉरेस्टच्या
चांगल्या कामामुळे लोकांना वनविकासाच्या प्रक्रियेत आपला समावेश व्हावा असे
वाटायला लागले आहे. वनविभागाकडे अनेक वर्ष दूर्लक्ष झाले असून आता मात्र
वनविभागाने चांगली आघाडी घेतली आहे. पहिल्यांदाच वनविभागाचे बजेट तीनपट
वाढवून देण्यात आले असून वनविभागाच्या निधीला प्रथमच कट लावण्यात आला
नाही. वन कर्मचा-यांचा भत्ता 1500 रुपये करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र
अधिकारी यांना 280 गाडया दिल्या असून त्यावर दिवा लावण्याची परवानगी
दिल्याचे त्यांनी सांगितले. 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लावण्याचा
कार्यक्रम राबविला जाणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी
वनविभागावर असल्याचे त्यांनी सांगितले.
वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांची वेतनश्रेणी, गणवेश,
निवासस्थान, संरक्षण,आश्वासीत प्रगती योजना, रिक्त पदे, आदि प्रश्न
आपल्याला माहिती असून हे प्रश्न टप्प्या टप्प्याने सोडविण्यासाठी
सर्वशक्तीनिशी प्रयत्न केल्या जाणार आहेत असे ते म्हणाले. वरिष्ठ वनाधिकारी
ए.के.निगम उदया निवृत्त होणार असून त्यांचा या अधिवेशनात ना.सुधीर
मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निगम यांनी उत्कृष्ठ कार्य
केल्याचा गौरव वनमंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केला.
ना.सुधीर मुनगंटीवार व नवनियुक्त अध्यक्ष चंदनसिंह चंदेल
यांचा संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात
आला. वनविभागात उत्कृष्ठ कार्य करणा-या वन कर्मचा-यांचाही याप्रसंगी सत्कार
करण्यात आला.
वनविकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष चंदनसिह चंदेल, वनबल
प्रमुख ए.के.निगम, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत,
अप्पर मुख्य वनसंरक्षक पा.ना.मुंडे, अप्पर मुख्य वनसंरक्षक के.एस.खवारे,
मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जे.पी.गरड
यांची यावेळी भाषणे झालीत. प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले.
वेतनश्रेणी, संरक्षण, निवासस्थान, आश्वासीत प्रगती योजना, साप्ताहिक रजा,
अतिरीक्त भत्ता, वन्यजीव मध्ये सरसकट एकस्तर, वन खात्याची पुर्नरचना,
शस्त्रनिधीत सुधारणा, वैद्यकीय सुविधा, कार्यशाळा व बदली धोरण यासह विविध
29 मागण्या त्यांनी यावेळी केल्या. उपस्थितांचे आभार विशाल मंत्रीवार यांनी
मानले. या कार्यक्रमास राज्यभरातून वनपाल, वनरक्षक व वनमजूर मोठया
संख्येने उपस्थित होते.

Post a Comment