जप्त केलेले वाघाचे कातडे |
प्रविण गोंगले,/ चंद्रपूर
वाघाची कातडी विकण्यासाठी तेलंगणातुन महाराष्ट्रात येउ पाहणा-या टोळीचा चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश करुन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई 3 मे च्या रात्री गोंडपिपरी परिसरात झाली असून या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना वाघाच्या कातडीसह ताब्यात घेतलं आहे. जप्त करण्यात आलेल्या कातडीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 50 लाखाच्या घरात असल्याचं उघड झालं आहे.
पट्टेदार वाघाच्या अधिवासासाठी चंद्रपूर जिल्हा जगप्रसिध्द आहे. वाघाचा अधिवास असलेल्या जिल्ह्यातील गोंडपिपरीचा जंगलदृष्ट्या भाग लगतच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील जंगलाशी जोडला गेला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील वाघ राज्य सिमा ओलांडुन मुक्त भ्रमण करत असतात.
त्यातच तेलंगणा राज्यात शिकारीचं प्रमाण अधिक आहे आणि त्यातीलच एका शिकारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तहेरानं चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तेलंगणा राज्यातील एक टोळी वाघाची कातडी विक्रीसाठी महाराष्ट्रात येत असल्याची गोपनिय माहिती वर्णनासह दिली. या माहितीच्या आधारे पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक कंकाळे व त्यांच्या टिमनं गोंडपिपरी येथील बस स्थानक परिसरात सापळा रचला आणि गुप्तहेरानं सांगितलेल्या वर्णनातील 4 दुचाकी स्वारांची विठ्ठलवाडा मार्गावर झडती घेतली.
यावेळी त्यांच्या जवळील मोठ्या पिशवीत वाघाची कातडी आढळुन आली. मृत वाघ मादी असून ती पुर्ण वाढ झालेली आहे. तसंच तिच्या शरीरावरील सर्व अवयव शाबुत होते. दरम्यान, या प्रत्यक्ष पुराव्यानंतर पोलिसांनी त्या चारही जणांना कातडीसह ताब्यात घेत, त्यांचेवर गुन्हा नोंद केला. या प्रकरणात अटक झालेल्या 4 पैकी 3 आदिलाबाद तर, 1 जण वारंगल येथील रहिवासी असून या वाघीणीची शिकार शातीर शिका-यांकडुन झाल्याचा अंदाज पोलिसानी वर्तविला आहे.
या प्रकरणात त्यांच्यासह अन्य लोकांचा समावेश असल्याचंही पोलिसांचं म्हणणं असून आंतर राष्ट्रीय बाजारात वाघाच्या कातडीची किंमत अंदाजे 40 ते 50 लाख रुपये इतकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक गजानन कंकाळे यानी दिली आहे.
वाघाची कातडी कुणासाठी आणली गेली आणि या टोळीनं अशाप्रकारे किती वाघाची शिकार व सौदे केले आहेत, यावर पोलिसांचं लक्ष केंद्रीत असणार आहे. वाघांच्या संख्येच्या दृष्टीनं श्रीमंत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात या शिकारी टोळीची झालेली एन्ट्री धोक्याची घंटा समजली जात आहे.
Post a Comment