प्रवीण गोंगले / विशेष प्रतिनिधी /---
पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. येथील पवित्र अशा चंद्रभागेचे नदीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी देशातील तज्ज्ञांची लवकरच पंढरपूर येथे परिषद घेतली जाईल असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पंढरपूर येथे नमामी चंद्रभागा अभियानाबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, आ संजय धोटे , जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी रणजित कुमार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या परिषदेसाठी देशातील या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,संबंधित महापालिकेचे महापौर, स्वयंसेवी संस्था यांना बोलविण्यात येईल. सदर काम कसे करायचे, येणारा खर्च, या बाबतच्या कायदेशीर तरतुदी आदि बाबतचा विचार करुन आराखडा तयार केला जाईल. या परिषदेसाठी मा. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले.
सदरचे काम मिशन म्हणून शासनाने हाती घेतले आहे. अंदाजे 700 वर्षापासून वारकरी विठ्ठलाचा जयघोष करीत पंढरपूरात येतात. विठ्ठल चरणी असलेली पवित्र अशी चंद्रभागा दुषित आहे. नदीला आपण माता म्हणतो. असे हे स्थान अस्वच्छ असणे योग्य नाही. भीमा नदीचा उगम होतो तेथील कुंडही अस्वच्छ असणे योग्य नाही. यासाठी भीमाशंकरचाही चांगला आराख्डा केला आहे. त्याच धर्तीवर चंद्रभागेचा आराखडा करावा. याबाबतची तांत्रिक माहिती घेण्यासाठी, पाहणीसाठी खास आलो आहे. या ईश्वरीय कामात सर्वांनी मिशन मोडमध्ये काम करावे असे आवाहनही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नदी शुद्धीकरणाबाबत जगभरातील विठ्ठल प्रेमीच्या व तज्ज्ञांच्या सूचना जाणून घेण्यासाठी वेबसाईट तयार केली जाईल. याद्वारे माहिती घेतली जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.
या प्रसंगी पंढरपूर विकास आराखड्यातील कामाची माहिती घेतली. सदरचे काम गतीमानतेने होणे आश्यक आहे. याबाबत पुणे येथे स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सदरील बैठकीत भीमा नदी खोरे येथून पंढरपूर पर्यंतचे अंतर, विविध मनपा, नगरपालिका कडून अप्रक्रियाकृत नदीत सोडले जाणारे पाणी, भीमा नदीच्या काठावरील औद्योगिक वसाहती, खाजगी जमिनीवरील उद्योग, साखर कारखाने यातून सोडले जाणारे पाणी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेती. तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामविकास, नगरविकास विभागाने घरगुती सांडपाण्यवर प्रक्रिया करणे, पंढरपूर शहरात वारीच्या कालावधीत करावयाच्या विविध उपाय योजनाबाबतही माहिती जाणून घेतली. पंढरपूर फेज 3 च्या रुपये 48.50 कोटीच्या मलजल निस:रन आराखडा ( सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन) बाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा मंत्री यांच्यास्तरावर तपासून सादर करावा त्यास मंजुरी दिली जाईल अशी ग्वाहीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.बैठकीपूर्वी अर्थमंत्र्यांनी चंद्रभागा नदीची पाहणी सुद्धा केली .
Post a Comment