BREAKING NEWS

Friday, June 17, 2016

हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करणार ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे ***हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन ! ***

पणजी (गोवा) -

 

  हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गोमंतकाच्या पावनभूमीत हिंदुत्वाचे राष्ट्रव्यापी संघटन आकार घेऊ लागले आहे. गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर या वर्षीही १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. या संघटना मंदिररक्षण, संस्कृतीरक्षण, गोरक्षा, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद या समस्यांविषयी प्रबोधन आदी क्षेत्रांत कार्य करत आहेत.
       मागील ४ अधिवेशनांत निश्‍चित झालेल्या समान कृती कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन हिंदुहिताचे आणि हिंदूसंघटनाचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे करणार आहोत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. गोवा येथील पत्रकार परिषदेस हिंदु महासभेचे श्री. शिवप्रसाद जोशी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश ताकभाते, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते. गोव्याबरोबरच मुंबई आणि हुबळ्ळी (कर्नाटक) येथेही पत्रकार परिषद पार पडली.
       गोवा येथील पत्रकार परिषदेत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले, हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असला, तरी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्या बंदी, श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता हिंदु संघटनांकडून पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे. मागील ४ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार देशभरात १० प्रांतांत ५० ठिकाणी प्रत्येक महिन्याला राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली, तर ५१ ठिकाणी प्रादेशिक, तसेच स्थानिक संघटनांचे संघटन करण्यासाठी राज्यस्तरीय आणि प्रांतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले.
       या अधिवेशनाला छत्तीसगड येथील प.पू. स्वामी श्रीरामबालकदासजी महाराज, नेपाळचे माजी राजगुरु आणि तेथील राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष श्री. माधव भट्टराय, श्रीलंकेतील निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन, सुदर्शन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, पू. साध्वी रेखा बहनजी, तामिळनाडू मधील हिंदु मक्कल कच्छीचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, पंजाब गोरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीशकुमार प्रधान, भाग्यनगर (हैदराबाद) येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, हिंदु फ्रन्ट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरिशंकर जैन, यूथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल, भारत रक्षा मंचचे संयोजक श्री. सूर्यकांत केळकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
हिंदु राष्ट्र संघटक निर्मितीचे प्रशिक्षण !
       राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना संघटक आणि कार्यकर्ते यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करता यावी, तसेच अंगभूत कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी या अधिवेशनात हिंदु राष्ट्र संघटक निर्मितीचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा, वैध मार्गाने आंदोलन कसे करावे, व्यक्तिमत्त्व विकास आदींचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी दिली.
       अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण (LIVE Streaming) हिंदु जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात येणार आहे. हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले.
सनातन धर्माचे पुनरुज्जीवन 
करावे लागेल ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
       पणजी येथे १६ जून या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी समर्पक उत्तरे देऊन पत्रकारांचे शंकानिरसन केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदु राष्ट्राची नेमकी आध्यात्मिक परिभाषा स्पष्ट केली. पत्रकारांनी विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्‍न आणि त्यांना पू. डॉ. पिंगळे यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.
प्रश्‍न : सध्याच्या शासनासंदर्भात तुम्ही निराश आहात का ?
उत्तर : गोवंश हत्या बंदी कायदा, अयोद्धेतील राममंदिर, काश्मीरमधील हिंदूंची समस्या आदी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिंदूंच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लढा देण्यासाठी हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. वर्तमान शासनाने या समस्यांविषयी अद्याप धोरण स्पष्ट केलेले नाही. शासन याविषयी काही करत आहे, असे दिसत नाही. जागृतीद्वारे हिंदूंचे संघटन करून शासनावर दबाव आणून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार आहोत. आम्ही कोणाविषयी निराश होत नाही. निष्काम कर्म करा, असे आमचा धर्म आम्हाला सांगतो, त्यामुळे आम्ही फळाची अपेक्षा न धरता कर्म करतो.
प्रश्‍न : गोवंश रक्षणाचा कायदा बनला असला, तरी अजून या कायद्याची व्यवस्थित कार्यवाही होत नाही ? हा शासनाचा कमकुवतपणा नाही का ?
उत्तर : निश्‍चितच हा शासनाचा कमकुवतपणा आहे. त्याचबरोबर शासन पालटल्याने व्यवस्था आणि समाज यांमध्ये पालट होत नाही. हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेद्वारे प्रत्येक नागरिकामध्ये सकारात्मक पालट घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत समाज, पोलीस, प्रशासन यांची विचारधारणा सत्त्वगुणी होत नाही. तोपर्यंत हे परिवर्तन होणार नाही, असे आम्हाला वाटते.
प्रश्‍न : आणखी किती अधिवेशने घेणार आहात ?
उत्तर : मागील ७० वर्षांपासून हिंदूंवर आघात होतच आहेत, त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्यास काही कालावधी निश्‍चितच लागेल. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या दृष्टीने वर्ष २०१८पासून आंदोलनांची तीव्रता वाढेल. त्यादृष्टीने आमचे कार्य चालू आहे.
प्रश्‍न : मुसलमानमुक्त भारत निर्माण करायचा आहे, असे भाजपचे एक खासदार म्हणतात. हिंदु राष्ट्र संकल्पना आणि मुसलमानमुक्त भारत या संकल्पनेत भेद काय ?
उत्तर : हिंदु राष्ट्र ही मूलत: आध्यात्मिक संकल्पना आहे. सध्या या संकल्पेनेचे विश्‍लेषण प्रसिद्धीमाध्यमांकडून राजकीय स्तरावर केले जात आहे. सनातन वैदिक धर्म व्यापक आहे. आता विश्‍वात्मके देवे, अशी प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्‍वर, चिंता करितो विश्‍वाची, असे म्हणणारे समर्थ रामदासस्वामी यांनी व्यापक धर्माची संकल्पना मांडली. आपल्या वेदांनीही वसुधैव कुटुम्बकम् ही संकल्पना मांडली आहे. ही आमची हिंदु राष्ट्राची संकल्पना आहे. पाच मुसलमान पातशाह्यांशी लढणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्मांचे लोक प्रेमाने रहात होते. आमच्या हिंदु राष्ट्राचा संबंध राजकीय दृष्टीने नाही, असे मी स्पष्ट करू इच्छितो.
       केवळ सनातन धर्मच मानवता शिकवतो. अन्य उपासना पंथ आपलाच मार्ग श्रेष्ठ असे म्हणतात. आमच्या पंथात नसाल, तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, असे हे पंथ सांगतात. सनातन धर्म म्हणजेच मानवता आहे. मानवता हवी असेल, तर सनातन धर्माचे पुनरुज्जीवन करावे लागेल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.