चांदुर रेल्वे : (शहेजाद खान ) -
सद्यस्थितीत चांदुर रेल्वे पोलीस विभागाचा गलथान कारभार जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे. शहरात पोलीसांच्या छत्रछायेत वरली मटका, अवैध दारू विक्री, अवैध प्रवासी वाहतुक जोमात सुरू होती. मात्र मीडीआ इम्पक्टमुळे यावर अमरावती पोलीसांनी काही प्रमाणात अंकुश लावले. मात्र आता रेती वाहतुक करणाऱ्या ट्रकांनी शहरात धुमाकुळ घातला आहे. चांदुर रेल्वे पोलीसांच्या तसेच महसुल विभागाच्या आशिर्वादाने सकाळी अवैध रेती वाहतुकीचे अनेक ट्रक एकसारखे भरधाव वेगाने चांदुर शहरातुन अमरावतीकडे जात असल्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातुन अवैध रेती वाहतुक जोमात सुरू आहे. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अनेक ओव्हरलोडेड ट्रक देवगाव रोडवरून अमरावतीकडे बायपास मार्गाने जलदगतीने जातात. रेतीच्या अवैध व्यवसायामुळे चांदुर रेल्वे परीसरातील रस्त्यांची होणारी दयनिय अवस्था व त्यामुळे घडणारे अपघात सामान्यांची परीक्षाच घेत आहे. परीसरातील निमगव्हान, वाघोली यांसह अनेक नदीपात्रातून वर्धा रेतीचा उपसा केला जातो. प्रत्येक ट्रकमध्ये नियमाप्रमाणे २०० फुटापर्यंत रेती वाहतुक करता येते. मात्र या नियमाला धाब्यावर बसवत रेती माफीया तब्बल ३५०-४०० फुटापर्यंत अवैधरीत्या रेती वाहतुक करतात. तसेच शहरातुन जातेवेळी या ट्रकांची स्पीड सुपरस्फाट राहत असुन मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ओव्हरलोडेड वाहतुकीमुळे
रस्त्यांची दुरवस्था होत आहे. परीसरातील काही रस्त्यांची तर अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून अपघातालाही आमंत्रण मिळत आहे. दुसरीकडे जे रस्ते तालुका मार्ग, राज्य मार्ग अंतर्गत येतात त्या रस्त्यांच्या डागडुजीवरही शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला जातो. या अवैध रेती वाहतुकदांकडुन चांदुर रेल्वे पोलीसांना तसेच महसुल विभागाला चांगलीच चिरीमिरी मिळत असल्याची खमंग चर्चा आहे. त्यामुळेच यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अंकुश लावण्यात येत नाही.
वरिष्ठांनी याची तातडीने दखल घवून भरधाव जाणाऱ्या व अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रकांवर कारवाई करून यावर आळा घालावा अन्यथा एखादा मोठा अपघातसुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post a Comment