-
प्राप्तमाहितीनुसार, शहरातील आठवडी बाजारात खरेदी करीत असतांना दोन शहरवासीयांचे २४ हजार ९९० रूपयांचे दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. काही दिवसांपुर्वी तालुक्यातील बग्गी येथील महाविद्यालयीन युवकाचा बस स्थानक परीसरातुन महागडा मोबाईल लंपास झाल्याचीही घटना घडली होती. यापुर्वी सुध्दा आठवडी बाजार, बसस्थानक परीसरातुन अनेक मोबाईल, पैसे लंपास झाल्याच्या घटना घडल्या. मात्र सुस्त पोलीस प्रशासनाला अजुनही जाग आलेली नाही. अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या चांदुर रेल्वे शहरातील मोबाईल चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बसस्थानक परीसरात सायंकाळ दरम्यान बसमध्ये चढतेवेळी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा अनेक चोरटे घेतात. त्यामुळे दररोज बसस्थानक परीसरात व रविवारी आठवडी बाजारात पोलीसांचा बंदोबस्त असणे आवश्यक आहे.
अनेक शहरवासी नाही करत तक्रार दाखल
काही महिन्यापुर्वी शहरातील एका युवा सामाजिक कार्यकर्त्याचा तब्बल २५ हजार रूपयाचा मोबाईल लंपास झाला होता. या व्यतिरीक्त अनेकांचे मोबाईल, पॉकेट लंपास केल्याच्या घटना नेहमीच घडत आहे. मात्र अनेक शहरवासी पोलीसात तक्रार देणे टाळतात. कारण तक्रार देवूनही कोणताही फायदा होत नसुन या उलट तक्रारकर्त्याला वारंवार पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात. मोबाईलबद्दल अनेक प्रश्न विचारत असल्याने तक्रारकर्तेच त्रस्त होत असल्याचेही काहींनी सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याकडुन एवढी माहिती घेवूनही तपास मात्र शुन्य असल्याने अनेक शहरवासी आता तक्रार देणे सुध्दा टाळत असल्याचे समजते..

Post a Comment