BREAKING NEWS
Showing posts with label नवी दिल्ली-. Show all posts
Showing posts with label नवी दिल्ली-. Show all posts

Saturday, May 13, 2017

महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान ......<>....<> परिचारिका या आरोग्य सेवांच्या अग्रभागी : राष्ट्रपती

नवी दिल्ली-


परिचारिका या राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या अग्रभागी असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशभरातील 35 परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, आरोग्य सचिव सी.के मिश्रा, वरीष्ठ अधिकारी, विविध शासकीय रूग्णालयातील परिचारिका उपस्थित होत्या. 
राष्ट्रपती म्हणाले, परिचारिकांच्या योगदानावरच आरोग्य क्षेत्राचे यश अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील व्यवस्थेमध्ये परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका यांची भूमिका महत्वपूर्ण असून, त्या कमी खर्चात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करतात. राष्ट्राला या सेवेचा गर्व आहे. 20 व्या तसेच 21 व्या शतकात आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळेच शहरी तसेच ग्रामीण जीवनमान उंचावले आहे. यासह माता मृत्युदर, नवजात शिशु मृत्युदर नियंत्रित करण्यामध्ये मोठे यश आले असल्याचे, राष्ट्रपती म्हणाले.
आरोग्य सेवांमध्ये मानदंड ठरविणे ही काळाजी गरज असल्याचे यावेळी राष्ट्रपती म्हणाले. ‘2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाची’ प्रशंसाकरून यामध्ये नवनवीन शोध, संशोधन, आणि आधुनिक काळाशी सुसंगत बदल सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परिचारिका या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भूमिका पार पाडीत आहेत. त्यामुळे व्यावसायिक विकास तसेच मनुष्य बळ विकास धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. 
याप्रसंगी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या देशभरातील 35 परिचारिकांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील 3 परिचारिकांचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशस्तीपत्र, आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. हा पुरस्कार 1973 पासून प्रदान करण्यात येतो.
मुंबईतील टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या नर्सिंग अधिक्षक श्रीमती स्वप्ना जोशी या मागील तीन दशकापासून परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी कॅन्सरग्रस्त बालकांसाठी विशेष कार्य केले आहे. बालकांना होणारे कॅन्सर (ऑन्कोलॉजी) यामध्ये श्री जोशी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच याविषयांवर अधिक संशोधनासाठी त्यांनी ‘माय चाईल्ड मॅटर्स’ या प्रकल्पावर काम केले. सध्या त्या अन्य परिचारिकांना कॅन्सरग्रस्त बालकांना कशा पद्धतीने हाताळायला हवे याबाबत प्रशिक्षण देतात. ‘वैद्यकिय शस्त्रक्रिया नर्सिंग’ हे पुस्तक श्रीमती जोशी यांनी लिहीले आहे. तसेच ‘प्रसुती शास्त्रातील नर्सिंग’ या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक शोध प्रंबध सादर केलेले आहेत. श्रीमती जोशी या नोंदणीकृत परिचारिका तसेच नोंदणीकृत मिडवाईफ आहेत. श्रीमती जोशी यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते गौरविण्यात आले. 
जळगाव जिल्ह्याच्या,चोपडा तालुक्यातील अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या मागील 32 वर्षापासून आरोग्य सेविका म्हणून समर्पित तसेच उत्साही भावनेने काम करीत आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्र’सुतिपूर्व आरोग्य विषयक जागरूकता आणि राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांच्या गौरवही करण्यात आलेला आहे. कुशल बाळंतपण, नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रमातही त्या हिरीरीने भाग घेतात. स्थानिक पातळीवर आरोग्य संदर्भात मोठया प्रमाणात जागरूकता केल्यामुळे 2013-14 मध्ये त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक प्रसूती झाल्याची नोंद आहे. आरोग्य क्षेत्रासोबतच त्या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्येही स्वयंस्फुर्तपणे भाग घेतात. 
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील ढेकु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती कल्पना गायकवाड यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. ढेकु येथील आरोग्य क्षेत्रात मागील 28 वर्षापासून त्या सेवा देत आहेत. प्रसुतीपूर्व तसेच प्रसुती दरम्यान मातेची तसेच नवजात शिशुची काळजी यासह कुटुंब कल्याण या संबधीत त्यांनी सर्वाधिक कार्य केले आहे. केंद्र शासनाच्या सर्वच आरोग्य संबधित कार्यक्रम त्या मोठया उत्साहाने राबवितात. त्यांच्या या कामाची प्रशंसा स्थानिक पातळीवरही करण्यात आली आहे.

Monday, May 8, 2017

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश अतिरिक्त एक लाख टन तुरीची 31 मेपर्यंत खरेदी करण्यास परवानगी

 नवी दिल्ली-

 राज्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. अतिरिक्त एक लाख टन तुरीची 31 मेपर्यंत नाफेडमार्फत खरेदी करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली. तसेच ही खरेदी झाल्यानंतर परिस्थिती पाहून आणखी एक लाख टन तुरीची खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील तुरीचे विक्रमी उत्पादन पाहता तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे अतिरिक्त दोन लाख टन तूर खरेदीसाठी परवानगी मागितली होती. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानुसार अतिरिक्त एक लाख टन तुरीची खरेदी नाफेडमार्फत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही खरेदी झाल्यानंतर परिस्थिती बघून आणखी एक लाख टन तुरीची खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
मागील सरकारच्या काळात जेव्हा 13 लाख टन उत्पादन झाले होते, तेव्हा केवळ 20 हजार टन तुरीची खरेदी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षात वीस लाख टनाहून अधिक उत्पादन झाले असताना राज्य सरकारने केलेली आजपर्यंतची विक्रमी खरेदी आहे. ही खरेदी सहा लाख टनावर जाण्याची शक्यता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

Saturday, April 22, 2017

प्रधानमंत्री पुरस्कार : सामुहिक प्रयत्नांचे यश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे

नवी दिल्ली-
लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी, बँकाचे अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नांमुळे जालना जिल्हयात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेची’ प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली , या सर्वांना मी केवळ नेतृत्व दिले अशा भावना जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी आज व्यक्त केल्या.
नागरी सेवा दिनानिमित्त आज विज्ञानभवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जालना जिल्हयाला गौरविण्यात आले, श्री. जोंधळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्रात कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी श्री. जोंधळे बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. जोंधळे यांचा सत्कार केला. यावेळी राज्य शासनाच्या रोजगार हमी योजना (नियोजन) विभागाचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे उपस्थित होते.
यावेळी श्री. जोंधळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, जालना जिल्हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. एप्रिल २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात झाली तेव्हा, जिल्हयातील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सामुदायिक प्रयत्नातून दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व शेतक-यांच्या हितासाठी जोमाने कार्य करण्याचे ठरविले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जिल्हयातील शेतक-यां पर्यंत पोहचविण्यासाठी सर्वप्रथम जिल्हयातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांनी शेतक-यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना या योजनेची माहिती व महत्व पटवून दिले. जिल्हा मध्यवर्ती बँक व अन्य बँकाच्या अधिकारी-कर्मचा-यांनीही मेहनत घेतली. तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या योजनेबद्दल शेतक-यांमध्ये जनजागृती करण्याचे काम यशस्वीपणे केले. यासर्वांच्या प्रयत्नांमुळे जिल्हयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अमंलबजावणी होऊ शकली, आपण या सर्व यंत्रनेला सक्षम नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य श्री. जोंधळे यांनी केले. या योजनेअंतर्गत मोठया संख्येने शेतक-यांनी सहभाग नोंदवला त्याची दखल प्रधानमंत्री पुरस्कारासाठी घेण्यात आली.
यावेळी श्री. जोंधळे यांनी प्रधानमंत्री पुरस्काराच्या निवड प्रक्रियेबद्दलही उपस्थितांना माहिती दिली. परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, मंत्रालय मुंबई येथील अधिकारी –कर्मचारी, पत्रकार, कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत यावेळी उपस्थित होते.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. 

Friday, April 21, 2017

जालना जिल्हयाचा राष्ट्रीय सन्मान, ‘प्रधानमंत्री पुरस्काराने’ गौरव

नवी दिल्ली-


 ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जालना जिल्हयाचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना ‘प्रधानमंत्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तर, महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा देशातील १० अभिनव योजनेत समावेश करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. येथील विज्ञानभवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१५-१६ साठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, कॅबीनेट सचिव पी.के.सिन्हा यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजना’,‘दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना’, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’,‘स्टँडअप इंडिया’-‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट’ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या जिल्हाधिका-यांना विविध श्रेणींमधे पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात आले. राज्यांच्या श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जालना जिल्हयात २०१५-१६ या वर्षात खरीप हंगामात शेतक-यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनें’अंतर्गत एकूण २५ कोटी विमा हप्ता भरला आणि जिल्हयातील पीक विमा घेतलेल्या ९५ टक्के शेतक-यांना ४३१ कोटी ६४ लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली. याच वर्षात रब्बी हंगामात शेतक-यांनी २ कोटींचा विमा हप्ता भरला आणि त्यांना ४४ कोटी २९ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली. वर्ष २०१६-१७ मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात ४ लाख ६९ हजार आणि रब्बी मध्ये १ लाख २७ हजार शेतक-यांनी ३९ कोटी रूपयांचा विमा हप्ता भरून पिक विमा योजनेत भाग घेतला.
‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ची अंमलबजावणी करणा-या देशातील सर्वच जिल्हयांनी प्रधानमंत्री पुरस्कारासाठी अर्ज केला होता. देशातील १२ जिल्हयांची यातून निवड करण्यात आली व त्यांचे सादरीकरण झाले , यानंतर अंतिम ४ जिल्हयांमधून जालना जिल्हयाची निवड करण्यात आली.

Wednesday, January 18, 2017

सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो - नवा स्मार्टफोन भारतात दाखल

नवी दिल्ली- 
जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपला आणखी एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोनची Online विक्री येत्या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.