BREAKING NEWS
Showing posts with label मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ). Show all posts
Showing posts with label मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ). Show all posts

Sunday, May 28, 2017

शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्‍हावा – छत्रपती खा. संभाजीराजे भोसले # जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे.

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – 


मी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतक-यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविणे या एकाच विचाराने राष्ट्रपती नियुक्‍त खासदारकीचा मी स्वीकार केला आहे. जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे आणि त्‍यासाठी समाज प्रबोधन झाले पाहिजे, असे विचार असलेल्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन, 6 जून हा दिवस राष्ट्रीय सण म्‍हणून साजरा व्‍हायला हवा, अशी मागणी युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली. महाराष्ट्र राज्य छावा क्रांतीवीर सेनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन नुकताच संपन्न झाले. त्‍यावेळी छत्रपती खा. संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे म्‍हणाले, मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. बहुतांश मराठा समाज हा शेती करतो. आज शेतक-यांचे अनेक समस्या आहेत. या समस्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता ताराराणी, धर्मवीर संभाजीराजे भोसले यांनी महान कार्य आपल्‍या कार्यकाळात केले आहे. बहुजन समाजाला जो न्याय दिला. अशाच पध्दतीचे कार्य येथून पुढे आपल्‍याकडून व्‍हावे, अशी इच्छा होती. महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या घराण्याला जो आदर दिला जातो. हे मी पहात होतो. केंद्र सरकारने शाहू महाराजांच्या घराण्याचा सन्मान करण्याची इच्‍छा प्रकट केली. म्‍हणून माझी राष्ट्रपती नियुक्‍त खासदार म्‍हणून नेमणूक करण्यात आली. समाजकार्य करण्यासाठी मी राजवाडा सोडून बहुजनांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. खासदार झाल्‍यानंतर पहिल्‍या भाषणातच मी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्‍या किल्‍ल्‍यांचे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. भारतीय पुरातत्व खात्‍याच्या अखत्‍यारीत असलेले हे गडकोट महाराष्ट्र सरकारकडे संवर्धनासाठी हस्तांतरीत करावेत यासाठी पाठपुरावा केला. त्‍याला यश आले. रायगडासाठी आता पर्यंत फक्‍त 1 कोटी 30 लाख खर्च झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नुकताच 660 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. त्यातून येत्‍या तीन वर्षात रायगडाचे संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये शिवभक्‍तांनी श्रमदानाचे योगदान देऊन सहभाग घ्यावा. तसेच सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, शिवनेरी हे पाच किल्‍ले 'मॉडेल फोर्ट' म्हणून विकास करण्याचा प्रयत्न आहे. त्‍यामुळे भविष्यात येणा-या पिढीला छत्रपतींच्या कार्याची माहिती होईल. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी 9 ऑगस्टला मुंबईत निघणा-या मराठा मोर्चात मी सहभागी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी आयुष्यात पहिल्यांदाच दिल्‍लीत मी गांधी टोपी घालून संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. महाराष्ट्रातील इतर खासदार मात्र नुसतेच बोलबच्चन असल्‍याची टीका देखील छ. संभाजीराजे यांनी केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डीत घडलेली घटना अत्यंत घ्रृणास्पद आहे. या घटनेचीही आपण संसदेत निंदा केली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीलाच देशभर साजरी केली जावी. पुढील वर्षातील शिवजयंती पंतप्रधानांच्या उपस्थितीत मी दिल्‍लीत साजरी करणार आहे, तसेच राज्‍यातील सर्व शेतक-यांचे कर्ज व वीज बील माफ करून सातबारा कोरा करावा, मराठा आरक्षण जाहीर करावे आणि थोर व्यक्‍तिंचा सोशल मीडियामध्ये होत असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी कठोर कायदा केला जावा, याबाबतही आपण पाठपुरावा करत असल्‍याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रास्ताविकात म्हणाले की, शेतक-यांना देशोधडीस लावणा-या पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला व समृध्दी महामार्गाला आमचा विरोध आहे. तसेच 1 जूनपासून शेतक-यांनी पुकारलेल्‍या बंदला छावाचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल वाजविणा-यांना लाज वाटली पाहिजे. शेतक-यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणाबाबत बोटचेपे धोरण घेणा-या सरकारला येथून पुढच्या काळात छावा स्वस्‍थ बसू देणार नाही. तसेच छावाचे पुढील महाआधिवेशन मराठवाड्यात घेण्यात येईल, असे गायकर यांनी जाहीर केले. या अधिवेशनात पुढील ठराव मंजुर करण्यात आले. शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचे कर्ज व वीज बील माफ करून 7/12 कोरा करावा. मराठा आरक्षण त्वरीत जाहिर करावे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करून पिडीत शेतक-यांना न्याय मिळावा. शेतक-यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण व वसतीगृह निर्माण करावे. महिला सबलीकरण व संरक्षण कायदा अंमलात आणावा. सर्व थोर महापुरुषांची अवहेलना थांबवावी व गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे. के.बी.सी. गुंतवणुकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करावे. स्त्री भ्रूण हत्या थांबवावी यासाठी कडक धोरण आखावे. देशभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करण्यात यावी याबाबत आदेश काढावेत. महापुरुषांच्या नावाने अंमली पदार्थांची विक्री, उत्पादन, बिअर बार, दारू विक्रीची दुकाने व फटाक्यांवरील नावे आदींवर बंदी आणण्यासाठी कठोर कायदा तयार करावा. वारकरी सांप्रदायातील किर्तनकार, मृदूंगाचार्य, गायनाचार्य, भजनी मंडळ आदींना मासिक मानधन विनाअट द्यावे. शहिद जवान व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जय जवान, जय किसान योजना राबवावी.

यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग, प्रदेश संघटक नितीन दातीर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रकाश पाटील, पुणे जिल्‍हाध्यक्ष राम घायतिडक पाटील, पुणे शहराध्यक्ष आरिफ सुभान शेख पुणे जिल्‍हा महिलाध्यक्षा अनिता पैठणपगार, पुणे जिल्‍हा युवक अध्यक्ष सागर भोसले, विद्यार्थी आघाडी पुणे जिल्‍हाध्यक्ष राजू फाले, संघटनेचे 28  जिल्ह्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, April 24, 2017

शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा कोणताही प्रस्ताव विचारधीन नाही ..सहकार खात्याचे माहिती अधिकारात उत्तर

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – 

उत्तर प्रदेश धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी जोर धरली असून योग्य वेळी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे पण प्रत्यक्षात असा कोणताही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रस्ताव सद्यस्थितीत विचारधीन नसल्याचा खुलासा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या माहितीत सहकार पणन आणि वस्त्रोद्योग खात्याने केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सहकार पणन आणि वस्त्रोद्योग खात्याकडे माहिती विचारली होती की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाच्या प्रस्तावाची माहिती दयावी. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग खात्याचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी अनिल गलगली यांस कळविले की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रस्ताव सद्यस्थितीत विचारधीन नाही. तसेच कर्ज माफीबाबत शासनाचे धोरण नसल्याने प्राप्त होणारी निवेदने आवश्यक ती कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे पाठविली जाते. अनिल गलगली यांनी प्राप्त अर्जाची संख्या देण्यास नकार देत त्यांस कळविले की कर्जमाफीच्या संदर्भासाठी वेगळी नोंदवही ठेवण्यात येत नसून कार्यासनास प्राप्त होणारे सर्व संदर्भ एकाच संदर्भ नोंदवहीत नोंदविले जातात. आज महाराष्ट्रात एकूण 5 एकर शेती असलेले 1 कोटी 37 लाख शेतकरी असून 5 एकरपर्यंत शेती असलेल्यांची संख्या 1 कोटी 7 लाख तर अडीच एकर शेती असलेले 67 लाख शेतकरी असल्याचे सांगितले. राज्यात कर्जमाफी करायची असल्यास 30,500 कोटी रुपयांची गरज आहे. अनिल गलगली यावर चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस विनंती केली की निवडणूकीच्या घोषणे अंतर्गत कर्जमाफी बाबत ठोस निर्णय घ्यावा.

Friday, April 21, 2017

मुसलमानांनो वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – 


वक्फ मालमत्तेचे दुसरे सर्वेक्षण सुरू झाले असून या सर्वेक्षण ला मुसलमान बांधवांनी सहकार्य करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्ठमंडळाशी बोलताना त्यांनी सांगितले.

समाजाला समजून समाजाच्या समस्या, मूळ प्रश्नाला समजून आपण काम करत आहात त्याबद्दल मुसलमान समाजाच्या वतीने अन्सारी यांनी तागडे यांचे धन्यवाद दिले. 'तहरी के औकाफ' आज संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने कार्यरत आहे याची माहिती दिली. तसेच ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ९२ हजार एकर जमीन असून १ लाख मालमत्ता हि वक्फ बोर्डाची असून त्यासाठी ४३ कर्मचारी त्यात ९ शिपाई, १ वाहन चालक आहे. तर एवढ्या मोठ्या कारभाराला हे कर्मचारी सांभाळू शकतात का असा प्रश्न उपस्थित केला होता. गोंदिया जिल्ह्यातून लोकं येतात नोंदणी चे २५०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ते आजपर्यंत मार्गी लागत नाही. हेरिंग साठी कोण भेटत नाही, लोकं थकून गेली, हैराण झालेत, परेशान झालीत. यांची कैफियत मांडली होती. कर्मचाऱ्यांच्या अभाव असल्याने त्यासाठी ग्रँड दिली गेली पाहिजे, किमान ६ कार्यालय झाली पाहिजेत, तर मुख्यमंत्र्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद असे ३ कार्यालय देतो, तसेच ७७० कर्मचारी देखील देण्याचे कबुली दिली होती. तर १०० कोटींची ग्रँड मागणी केली असता २०० कोटी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा तागडे यांच्या कडे अन्सारी यांनी केली. वक्फ बोर्डात जर पहिल्या पासून चांगले काम झाले असते तर आज आम्ही खूप चांगले काम केले असते असे तागडे यांनी सांगितले. वक्फ बोर्ड हे वेल्टीलेटर आहे त्यात नक्कीच सुधार होईल असे आश्वासन अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी दिले. मालमत्तेचे जे दुसरे सर्वेक्षण सुरु आहे. त्याबद्दल तागडे यांनी आव्हान केले आहे की, समाजाच्या विविध संघटनांनी जिल्ह्यातील तालुका स्थरावर गावे-गावे फिरून लोकांशी चर्चा करून वक्फ मालमत्तेची माहिती घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत ती पोहचावा जेणे करून परिपूर्ण सर्वेक्षण होण्यास मदत होईल तसेच त्यासंदर्भात मी स्वतः दौरा करणार असल्याचे तागडे यांनी सांगितले. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आमच्या कडून वक्फ संदर्भात जनजागृती मोहीम केली जात असल्याची माहिती दिली. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर चे अध्यक्ष इसाक खडके, मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी, सइद खान, पुणे सदस्य सिराज शेख, सयेद शकील, परभणी चे अध्यक्ष सयेद फारूक, मिर्झाअब्दुल कय्युमनदवी आदी उपस्थित होते.

Tuesday, April 4, 2017

रिपब्लिकन ऐक्य हवे पण ऐक्याच्या नावाने नवा गट काढणे थांबवा – रामदास आठवले

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – 

दलित आदिवासींवर आजही जातिवादातून अत्याचार होताहेत. नोकरीतील बॅकलॉग आणि प्रमोशन मधील आरक्षण नाकारले जात आहे. अन्यायाचे स्वरूप बदलत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र रिपब्लिकन चळवळीचा आढावा घेतला पाहिजे. आपल्यातील नकारात्मक विचार त्यागून चळवळीसाठी जागृत सतर्क राहून पुढे आले पाहिजे .रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज आहे. ऐक्यासाठी आपण सदैव तयार आहोत. युती गटबंधन हे राजकारणात तात्कालिक असतात. ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत.आपण अनेकदा प्रकाश आंबेडकरांना रिपाइं ऐक्याचे नेतृत्व करण्याचे आवाहन केलेले आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्वांनी आपले गट विसर्जित करून  एकत्र आले पाहिजे. मात्र रिपब्लिकन ऐक्यासाठी काम कारणारे नंतर ऐक्याच्या नावाने नवा गट निर्माण करतात ते थांबवायला पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. भायखळा  बीआयटी चाळ  सातरस्ता येथे शाहिद भाई संगारे आणि दिवंगत महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संयुक्त अभिवादन सभेत आठवले बोलत होते. शाहिद भाई संगारे यांचे त्यांच्या जन्मगावी अहमदनगर अकोले तालुक्यात किंवा मुंबईत योग्य जागा निवडून भव्य स्मारक उभारण्यासाठी आणि महाकवी दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे हि मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आवाहन रामदास आठवले यांनी दिले. शाहिद भाई संगारे आणि पँथर नेते महाकवी नामदेव ढसाळ हे दोन्ही नेते कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते होते कोणत्याही सत्ता पदा पेक्षा कार्यकर्ता पद महत्वाचे लोकांची चांगली कामे करून लोकांच्या मनात स्थान मिळविणे हेच कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट्य असले पाहिजे चळवळी साठी महान योगदान दिले. म्हणूनच भाई संगारे आणि पद्मश्री नामदेव ढसाळांचे स्मरण चळवळ आज करीत आहे असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Friday, March 17, 2017

शाश्वत शेती आणि सामाजिक संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने कार्य करावे – राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – 

देशाच्या विकासदरात उच्च शिक्षणाचा मोठा सहभाग असून शाश्वत शेती आणि सामाजिक संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.




मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात विशेष दीक्षांत समारंभ झाला. या समारंभात हरितक्रांतीचे जनक डॉ. एम .एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपतीच्या हस्ते डी.लिट पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव अनिल पाटील, सिनेट सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले की, विद्यापीठाने औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करुन  विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करुन कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत. डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्किल इंडियाच्या माध्यमातून जलद गतीने विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाबरोबरच सकस अन्न निर्मिती करणे गरजेचे असून त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. तसेच जागतिक  इको सिस्टीमचा अभ्यास करुन नवनिर्मितीसाठी संशोधन करावे. ते मानवाच्या आनंदासाठी सहाय्यभूत ठरेल. नवीन ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि कुशल मनुष्यबळ हे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यासाठी  संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे, असेही मुखर्जी यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणामुळे अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी देशाच्या विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. यापूर्वी आर.जी भंडारकर, दादाभाई नौरोजी, सी. व्ही,रमण आणि एम. विश्वेशवरय्या यांच्या सारख्या  समाजसुधारकांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बाजवली आहे. डॅा. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. गेली ६५ वर्ष त्यांनी कृषी क्षेत्रात महत्वाचे संशोधन केले आहे. कृषी बरोबरच अन्न सुरक्षा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. असे गौरवोद्गगार मुखर्जी यांनी यावेळी काढले. डॅा. स्वामीनाथन म्हणाले की, आदिवासी भागातील कुपोषण ही गंभीर समस्या असून कुपोषण कमी करण्यासाठी विद्यापीठाने विशेष प्रयत्न करावेत. आदिवासी भागात विद्यार्थ्यांनी जाऊन सामाजिक संशोधनावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने  झाला.

Thursday, March 16, 2017

काँग्रेस-राष्ट्रवादीची स्टेट बॅंकेवर धडक, हक्कभंगाचा इशारा


स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांची माफी मागावी! – विखे पाटील




मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी केलेले विधान शेतकऱ्यांचा अवमान आणि कायदेमंडळाच्या अधिकारांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी; अन्यथा विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.



स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा भट्टाचार्य यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज दुपारी बॅंकेच्या मुख्यालयावर धडक दिली. विधानभवनातून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आमदार सहभागी झाले होते. विरोधी पक्षांचे आमदार मुख्यालयात पोहोचले तेव्हा बॅंकेच्या अध्यक्षा उपस्थित नव्हत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांनी दिलेले निवेदन निषेधार्ह आहे. अरूंधती भट्टाचार्य देशाच्या किंवा राज्याच्या ‘पॉलिसी मेकर’ नाहीत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा अधिकार कायदेमंडळाचा आहे. या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांनी केला आहे. त्या केवळ एक लोकसेवक आहेत. त्यांनी लोकसेवकच रहावे. शेतकऱ्यांच्या मालक होण्याचा प्रयत्न करू नये, असाही इशारा विखे पाटील यांनी दिला. अरूंधती भट्टाचार्यांनी देशाची आर्थिक शिस्त कायम ठेवण्याबाबत केलेल्या सूचनांचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात कर्जमाफी करण्याची घोषणा केली, तेव्हा स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा गप्प बसल्या. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना भट्टाचार्यांना आर्थिक शिस्त का आठवली? असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. धाडस असेल तर त्यांनी कर्जमाफी न करण्यासंदर्भात आपली मते पंतप्रधानांना कळवावी, असे आव्हानही विरोधी पक्षनेत्यांनी दिले आहे. नेमक्या शेतकरी कर्जमाफीच्या वेळीच आर्थिक शिस्तीचा बागुलबुवा उभा करू पाहणाऱ्या याच अरूंधती भट्टाचार्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कर्जबुडव्या विजय मल्ल्यासह असंख्य धनदांडग्या उद्योगपतींची सुमारे 1 लाख 40 हजार कोटींची कर्जे ‘राइट ऑफ’ केली आहेत, याकडेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.