BREAKING NEWS

Thursday, October 20, 2016

अंनिसच्या घोटाळ्यांविषयी जाहीर व्यासपिठावर खुली चर्चा होणे आवश्यक ! - सनातन संस्थेचे अभय वर्तक यांचे जाहीर आव्हान

डावीकडून श्री. सुधाकर सुतार, श्री. मधुकर नाझरे,
श्री. अभय वर्तक, डॉ. मानसिंग शिंदे आणि श्री. शिवाजीराव ससे.

  • घोटाळ्यांविषयी तथाकथित विवेकवादी दाभोलकर कंपूने धारण केले मौनव्रत !
  • पत्रकार परिषदेला पोलिसांनी सुरक्षा पुरवली !
       कोल्हापूर- -


 सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भातील चौकशी अहवालात गंभीर ताशेरे ओढले आहेत. न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परीक्षण करावे, न्यासावरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे फेरचौकशी करावी, तसेच त्यावर प्रशासक नेमावा, असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अंनिसवर प्रशासक नियुक्त करावा. जाहीर व्यासपिठावर अंनिसच्या घोटाळ्यांविषयी उघड चर्चा करायला आम्ही सिद्ध आहोत, असे जाहीर आव्हान सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. सनातन संस्थेच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी येथील शाहू स्मारक भवनात दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. चौकशी अहवालातील गंभीर सूत्रांविषयीची सविस्तर माहिती श्री. वर्तक यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत दिली. 
       या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. सुधाकर सुतार उपस्थित होते. 
       एरव्ही विवेकाचा ढोल बडवणारे डॉ. हमीद दाभोलकर, अविनाश पाटील आणि दाभोलकर कंपू यांनी इतक्या गंभीर घोटाळ्यांविषयी मौनव्रत धारण केले आहे काय, असा घणाघात श्री. अभय वर्तक यांनी केला. डॉ. दाभोलकर यांंच्या अंनिसमध्ये इतके आर्थिक घोटाळे झाले आहेत, त्यामागे कोणाकोणाचे हितसंबंध आहेत ? त्यांचा दाभोलकर यांच्या खुनाशी संबंध आहे का ? अशा अनेक गूढ प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि डॉ. दाभोलकर यांच्या खर्‍या मारेकर्‍याला पकडण्यासाठी अंनिस न्यासामधील सर्व सदस्य आणि न्यासाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्वांची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. अंनिसचे घोटाळे गंभीर असल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा चौकशी अहवाल सांगत आहे. सनातन संस्थेने वारंवार सांगितल्यानुसार डॉ. दाभोलकर यांच्या खुनाशी अंनिसच्या ट्रस्टमधील आर्थिक अपव्यवहार कारणीभूत आहेत का ?, याची कसून चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही श्री. वर्तक यांनी या वेळी केली. 

पत्रकारांच्या प्रश्‍नाला श्री. अभय 
वर्तक यांनी दिलेली सडेतोड उत्तरे !

१. प्रश्‍न : अंनिसच्या घोटाळ्याविषयी तुम्ही खरी कागदपत्रे पत्रकार परिषदेत का दाखवत नाही ? पत्रकार विश्‍वास कसा ठेवणार ? 
उत्तर : आमच्याकडे खरी कागदपत्रे आहेत; मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही ती येथे आणलेली नाहीत. आता दिलेले पुरावे हे खरेच आहेत. आम्ही जर अशी खोटी माहिती पत्रकार परिषदेत देऊ लागलो, तर आमच्यावर गुन्हा प्रविष्ट होऊ शकतो. 
२. प्रश्‍न : विदेशातील अंनिसचे लोक भारतात पैसे पाठवून देत असतील का ? 
उत्तर : यासाठीच सनातनने दाभोलकर कुटुंबियांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. याद्वारे सत्य माहिती समाजासमोर येईल. 
३. प्रश्‍न : तुम्ही अंनिसच्या ट्रस्टींची चौकशी करण्याची मागणी करत आहात का ? 
उत्तर : हो. सर्वांची चौकशी व्हायला हवी. 
४. प्रश्‍न : तुम्ही दिलेला अहवाल मोघम आहे ? 
उत्तर : या पुराव्याच्या माध्यमातून अंनिसवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अजूनही आम्ही केलेल्या ८० टक्के आरोपांची चौकशी झालेली नाही. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करावे. बाहेरील प्रशासक नियुक्त केल्यास चौकशी व्यवस्थित होईल. अहवालातील माहितीमुळे अंनिसचे घोटाळे कशा स्वरूपाचे आहेत, याची आम्हाला दिशा मिळाली आहे. 
५. प्रश्‍न : ५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा तुम्ही निष्कर्ष काढला आहे का ? 
उत्तर : सर्व सूत्रांनुसार धर्मादाय आयुक्तांनी अन्वेषण केल्यास खरी माहिती उजेडात येईल. कोणतीही खुनाची घटना घडल्यानंतर आर्थिक हितसंबंध पडताळले जातात. त्याप्रमाणे अंनिसचेही आर्थिक हितसंबंध पडताळले पाहिजेत. अंनिसमधील अपहाराचे सूत्र डॉ. दाभोलकर यांच्या खुनाशी आहे का, हे पाहिले पाहिजे. त्यावेळी आम्ही अशी माहिती दिली असतांनाही अन्वेषण यंत्रणांनी या आधारे अन्वेषण केले नाही. विश्‍वस्तांची चौकशी झालीच पाहिजे. 
६. प्रश्‍न : सनातनवाले नेहमी डॉ. दाभोलकर यांच्यावर आरोप करत असतात. तुमच्याकडे पुरावे आहेत, तर तुम्ही न्यायालयात का जात नाही ? जनहित याचिका का प्रविष्ट करत नाही ? अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनाही हा प्रश्‍न विचारला असता, ते काही बोलले नाहीत ! 
उत्तर : सध्या डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभाग करत आहे. अंनिस संदर्भात पुष्कळ कागदपत्रे पाठवूनही सीबीआय याकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रकरणासाठी स्वतंत्र जनहित याचिका प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही. मी अधिवक्ता नाही. तुमच्या या प्रश्‍नाचे मी उत्तर देऊ शकणार नाही. तथापी धर्मादाय आयुक्तांकडे याचिकेप्रमाणेच चौकशी चालू असून त्याच्या तारखाही पडतात. या तारखांना दाभोलकर कुटुंबीय आणि आमच्याकडील लोकही उपस्थित रहातात. 
७. प्रश्‍न : तुम्ही मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेता; मात्र त्याचे आऊटपूट (फलित) काही मिळत नाही ? 
उत्तर : आम्हाला पत्रकारांचा आधार वाटतो; कारण गणेशचतुर्थीच्या दिवशी सनातनच्या आश्रमावर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊनच त्याला वाचा फोडली. प्रशासनाला जाग आणण्यासाठी विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. 
८. प्रश्‍न : सनातनला विदेशातून पैसा येतो का ? 
उत्तर : या संदर्भात वर्ष २००८ मध्ये एन्आयए आणि एटीएस् यांनी आमच्या संस्थेतील लेखापरीक्षकांनी केलेल्या अहवालांची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी अहवाल व्यवस्थित पाहून आश्‍चर्य व्यक्त केले. आम्ही सर्व व्यवहारांचे हिशेब चोख ठेवतो. 
       या वेळी एका पत्रकाराने तुम्ही मुसलमानांंविषयी सतत बोलत असता, मराठा क्रांती मोर्च्याच्या वेळी सर्व समाज एकत्रित झालेला तुम्हाला बघवत नाही का ?, असे प्रश्‍न विचारले. या वेळी आज हा चर्चेचा विषय नाही., असे श्री. अभय वर्तक यांनी सांगितले. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.