भंडारा -
देशाच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केले त्यामुळेच आज देशाचा व देशातील सामान्य नागरिक, दलित, पिडीत व शोषित वर्गाचा विकास शक्य झाला. विकसित भारताची संकल्पना साध्य करण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत विकास गरजेचा असून शासनाच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशीवार यांनी केले.
लाखनी तालुक्यातील शिवनी ( मोगरा ) येथे ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय डिजीधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होती. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शैलेद्र मिश्रा, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय बागडे, स्टेट बँकेचे जिल्हा शाखा व्यवस्थापक श्री. कुलकर्णी, खंडविकास अधिकारी साकोली श्री. ब्राम्हणकर, शिवणी ( मोगरा ) च्या सरपंच माया कुथे, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, पदमाकर बावणकर, मुख्याध्यापक महेंद्र राऊत, श्री. बोरकर, भिमराव खांडेकर उपस्थित होते.
आमदार काशीवार पुढे म्हणाले की, जीवन सुखमय बनविण्यासाठी कॅशलेस व्यवहार आवश्यक असून यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसेल व आर्थिक विकास साध्य करण्यात मदत होईल. शिवणी ग्रामवासियांनी कॅशलेस व्यवहार सुरु करुन संपूर्ण जिल्हयात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून यासाठी शिवनी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहिर झाल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय योजनेनुसार प्रत्येक राशनकार्ड हे आधारकार्डशी लिंक करुन चौकशी केल्यावर 42 टक्के राशनकार्ड बोगस ठरले व त्यामुळे शासनाची 700 कोटी रुपयांची बचत झाल्याचे सांगून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श समोर ठेवून त्यांचे विचार अंगिकृत करावे, असे आमदार काशिवार म्हणाले.
यावेळी सुधाकर आडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराने आम्हाला घडविले म्हणून आम्ही उत्तम जीवन जगत आहोत. कॅशलेस योजनेमुळे शिवणी वासियांना सुविधा उपलब्ध झाली असून पीओएस मशीनची माहिती सर्वांना झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. कुलकर्णी व इतर अधिकाऱ्यांनी पीओएस मशिनची माहिती देवून त्यांचे महत्व व उपयोगितेवर प्रकाश टाकला. शिवणीवासी व परिसरातील 108 लाभार्थ्यांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, राशन दुकानदारांचा समावेश आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करुन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दादू खोब्रागडे यांनी केले तर आभार ग्राम विस्तार अधिकारी श्री. गडपायले यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, बचत गटांचे कार्यकर्ते, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामवासी, महिला, पुरुष तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Sunday, April 16, 2017
जीवन सुखकर बनविण्यासाठी कॅशलेस व्यवहार आवश्यक - आमदार राजेश काशिवार
Posted by vidarbha on 9:59:00 AM in भंडारा - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment