सरकारने सांगितल्याप्रमाने शेतकऱ्यांनी शेतात तुर पिकवली. गेल्यावर्षी १२ हजाराचा भाव असतांना यंदा ५ हजारावर आला. म्हणजेच क्विंटलमागे ७ हजार कमी झाले असतांना सुध्दा अद्यापही सर्व शेतकऱ्यांची तुर खरेदी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संपुर्ण तुर तत्काळ खरेदी करावी व इतर मागण्यांसाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या १० मे रोजी प्रहारचे संस्थापक आमदार बच्चु कडु व शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच़्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात येणार आहे.
चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात संचालक मंडळ आपल्या पदांचा गैरवापर करत गैरप्रकार करत असल्याचा आरोप करीत नुकतेच स्थानिक बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. यानंतर आता पुन्हा प्रहार शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने डेरा आंदोलन होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरातील तुर हमीभावाने खरेदी करा, खरेदी केलेल्या तुरीचा मोबदला २४ तासाच्या आत देण्यात यावा, सरकारने तुर आयातीवर प्रतिबंध लावावा, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संपुर्ण तुरीचा पंचनामा करून तातडीने खरेदी करण्यात यावी या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहे.
तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली तुर विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावी. कायद्यानुसार शेतीमाल खरेदी अधिनियम १९६३-६७चे कलम २९ नुसार केंद्राने जाहिर केलेल्या हमी भावाने आपली तुर खरेदी करण्यास सरकारला व बाजार समितीस भाग पाडणार असुन आमदार बच्चु कडु व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या तुर खरेदी डेरा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रहारचे तालुकाध्यक्ष सौरभ इंगळे, विक्रम तायडे, प्रदिप नाईक, शिवसेनेचे राजुभाऊ निंबर्ते, बंडुभाऊ आंबटकर, मनिष कोहरे आंदींनी केले आहे..
प्रशासनाने घेतली बच्चु कडुंची धास्ती ??
अमरावती जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात बच्चु कडु हे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात प्रसिध्द आहे. ते नेहमीच अपंग बांधव व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आपला लढा देत असतात. अशातच त्यांचे शहरात उद्या होणाऱ्या डेरा आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासनाने पहिलेच धास्ती घेतल्याचे समजते. तसेच यावेळी चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात सुध्दा ठेवावा लागणार आहे.
Post a Comment