रेल्वे स्थानकाचे नाव मराठी भाषेत करण्यासाठी
प्रयत्न करणार्या मराठी बोला चळवळ संघटनेचे अभिनंदन !
महाराष्ट्रातच मराठीत नाव लिहिण्यासाठी असे निवेदन का
द्यावे लागते ? प्रशासनाने हे यापूर्वीच स्वतःहून करणे अपेक्षित होते !
![]() |
१. नेरुल असे लिहिलेला जुना फलक
२. पालटलेला नवीन फलक
|
नवी मुंबई- हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ रेल्वेस्थानकाच्या फलकांवरील मुख्य नाव नेरूल असे होते. ते मराठी भाषेत करण्यासाठी मराठी बोला चळवळ संघटनेने चालू केलेल्या मोहिमेचा परिणाम म्हणून रेल्वेस्थानकावरील फलकांवर मुख्य नाव नेरूळ असे केले आहे.
१. २ जून या दिवशी मराठी बोला चळवळ संघटनेने नेरूळ रेल्वेस्थानकाच्या फलकांवर मराठीत नाव देण्यासाठीची मोहीम चालू केली. संघटनेचे स्वप्नील बाम्हणे यांनी रेल्वेस्थानकावर प्राधान्याने मराठी भाषेत नाव लिहावे, असे निवेदन स्थानक प्रबंधकांकडे दिले. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
२. रेल्वे प्रशासनाने आपले दायित्व झटकत ते निवेदन सिडकोकडे देण्यास सांगितले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सिडकोकडे ते निवेदन दिले; परंतु तेथेही दायित्व ढकलण्याचा भाग होत होता. त्यामुळे ३ मास निवेदन कार्यालयात पडून होते.
३. स्वप्नील बाम्हणे यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी सिडकोतील अधिकारी बांबुर्डे यांना मागणीसंबंधी सविस्तर माहिती सांगितली. त्या वेळी सिडकोच्या अधिकार्यांनी त्यांची चूक मान्य करून कारवाई चालू केली. त्यानंतर ८ नोव्हेंबर या दिवशी नेरूळ स्थानकावरील मुख्य ८ फलक पालटून स्थानकाचे मुख्य नाव मराठीत करण्यात आले.
४. आणखी काही छोटे फलक हिंदी भाषेत आहेत; मात्र त्यासाठी निविदा काढाव्या लागणार असून तेही काम लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन बांबुर्डे यांनी दिले आहे. सरकारी कार्यालये आणि अधिकोष येथे मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी मराठी बोला चळवळ कायम पाठपुरावा करेल, असे स्वप्नील बाम्हणे यांनी सांगितले.

Post a Comment