BREAKING NEWS

Monday, June 5, 2017

दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ मराठवाडा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर -



  विदर्भ व मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाला प्रोत्साहन तसेच दूध संकलन व विक्रीसाठीच्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने या दोन्ही भागात आपले कार्य सुरु करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
विदर्भ व मराठवाडयातील दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे सहकार्य घेतांना बोर्डाला कृषी तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे आवश्यक असणाऱ्या संपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रामगिरी येथे विदर्भ व मराठवाडयातील कृषी विकास, दूध उत्पादन, मत्स्य विकास, तसेच संत्र्यासह फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय संस्था, विविध विद्यापीठ तसेच राज्य शासनाच्या विविध विभागाचे समन्वयासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय डेअरी विकास बोडाचे अध्यक्ष दिलीप राठ, व्यवस्थापकीय संचालक शिवा नागराजन्, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, डॉ. आशिष देशमुख, मलिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, प्रकाश गजभिये, तसेच केंद्र शासनांच्या विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने यापूर्वी झारखंड, तसेच वाराणसी येथे कृषी विकास व दूध उत्पादनाचे चांगले काम केले असून त्याच धर्तीवर विदर्भ व मराठवाडयात काम करुन या भागाचा विकास साध्य करायचा आहे. यासाठी या कामाला प्राधान्य द्यावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या 11 जिल्हयातील सुमारे तीन हजार गावात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड दूध संकलन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. अल्पावधीतच एनडीडीबी, मदर डेअरीने सुमारे 40 हजार लिटरपर्यंत दूध संकलन सुरु केले असून शेतकऱ्यांचाही चांगला सहभाग मिळत आहे. याच धर्तीवर विदर्भ व मराठवडयातील सर्व जिल्हयामध्ये आपले कार्यक्षेत्र वाढवावे यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्र शासनाच्या कापूस अनुसंधान केंद्र, निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, मृदा संशोधन विकास केंद्रासह पंजाबराव कृषी विद्यापीठ, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील विविध योजना, प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी राज्य शासन समन्वयाने काम करुन प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधन विकासाला प्रोत्साहन देण्यासोबतच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त दूध देणाऱ्या देशातील गीर, साहिवाल, यासह प्रजातींचे सिमेन्सचा वापर करुन दूध उत्पादन वाढविण्यासाठीचा उपक्रम राबवितांनाच मदर डेअरी व एनडीडीबी यांनी विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या पशुखादय व चाऱ्याच्या प्रजातीच्या विकासाला प्रोत्साहन देण्याबाबत सहकार्य करावे, अशी सूचना केली.
केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, तसेच निंबू वर्गीय फळसंशोधन केंद्रामधून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनासोबतच समन्वय करुन शेतकऱ्यांना संशोधित वाण उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना केली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी विदर्भ व मराठवाडयातील शेती विकासाला आवश्यक असणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असेही यावेळी सांगितले.
केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, तसेच निंबू वर्गीय फळसंशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी विदर्भ व मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जावून शेतात प्रत्यक्ष कोणती मदत लागते याची माहिती घेत त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. विदर्भात रेशीम उत्पादन वाढीसाठी आवश्यक संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतीशाळा आयोजित कराव्यात, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, कृषी विभाग, विविध कृषी विद्यापीठांचे अधिकारी, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विद्यापीठ, केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्थेच्या संशोधक व अधिकाऱ्यांनी यावेळी विद्यापीठामार्फत केलेल्या संशोधनाचे तसेच विकसित वाणांचे सादरीकरण केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.