जळगाव- येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून जोमाने प्रसार केला जात आहे. त्यामुळे जनमानसामध्ये धर्मजागृती सभेविषयीचा उत्साह शिगेला पोचला आहे. याचा परिणाम म्हणजे ठिकठिकाणी विविध मंडळांचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, सांप्रदायिक आणि विविध युवकांचे गट सभेला उपस्थित रहाण्याचे नियोजन करत आहेत. 
तन-मन-धन झोकून देऊन धर्माभिमानी करत आहेत सभेच्या प्रसाराची धर्मसेवा
   जळगाव शहर आणि ग्रामीण भागात कोपरा सभा, समूह बैठका, घरोघरी निमंत्रण, रिक्शाद्वारे उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळे (व्हॉट्स अॅप, फेसबूक, ट्विटर) आणि अन्य संकेतस्थळे यांच्या माध्यमातून या सभेचा प्रसार चालू आहे. काही धर्माभिमानी भ्रमणभाषवरूनही अनेकांना संपर्क करून धर्मसभेचे निमंत्रण देत आहेत. या सर्वांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सभेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शहरातील सर्व समाजातील प्रमुखांची बैठक पार पडली !
जळगाव शहरातील बारा बलुतेदार संघटना, मराठा समाज, ब्राह्मण समाज यांसारख्या सर्व समाजातील मान्यवरांची बैठक २३ डिसेंबर या दिवशी पार पडली. धर्मावरील आघातांची सद्यस्थिती पहाता सर्व समाजांनी एका भगव्याखाली एकत्र येणे, ही काळाजी आवश्यकता असल्याचा सूर या बैठकीत उमटला. या सर्व समाजाच्या प्रमुखांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध आहोत, असेही प्रतिपादन केले.

Post a Comment