जादा तूर विक्री करणाऱ्यांवर फौजदारी
सातबारा पाहून ठरविणार उत्पादन
सातबारा पाहून ठरविणार उत्पादन
यवतमाळ-
बाजारात तुरीचे भाव कोसळल्याने नियमबाह्य तूर विक्रीचे प्रकार वाढले आहे. हे नियमबाह्य प्रकार रोखण्यासाठी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चाप लावणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरेदी आणि कागदपत्रांची पुर्तता संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर खरेदी होणाऱ्या तुरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी 10 क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्यांची यादी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ, पेरे पत्रक, आधारकार्ड ही कागदपत्रे सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर करावयाची आहेत. याबाबत सुनावणी होऊन मर्यादित क्षमतेपेक्षा जादा तूर विकल्याचे निष्पन्न झाल्यास, अशा व्यक्तीवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. या सोबतच सहाय्यक निबंधक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची हमी केंद्रावर नेमणूक करावी. ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरीता आणला आहे, त्यांच्या काही अडचणी असल्यास त्यांनी स्थानिक सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी, या तक्रारी तात्काळ निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
खरेदी करण्यात आलेली तूर योग्य प्रतिची असल्याबाबत शहानिशा करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यासोबतच एकाच टोकनावर दोन शेतकरी शेतमाल विक्री करणे, बिना नावांचे टोकन देणे, ज्या नोंदवहीमध्ये शेतकऱ्यांचे नाव नोंदविले आहे, त्याच नंबरचे टोकन आहे काय, याची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. बाजार समितीमध्ये असलेले व्यापारी प्रतिनिधी, सभापती आणि त्यांचे संचालक मंडळ शासन तूर खरेदी करताना दबाब आणत असल्यास किंवा शासकीय कामात व्यत्यय निर्माण करीत असल्याचे आढळल्यास अशा संबंधितांवर फौजदारी कार्यवाही करावी, त्यांची तक्रार थेट जिल्हाधिकारी आणि सहकार विभागाकडे करण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी हमी भावाने तूर खरेदीचा आढावा घेतला. यात त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी यांनी हमी भावाने सुरु असलेल्या केंद्रावरुन तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्राप्त करावी. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यत 10 क्विंटलच्यावर तुरीची विक्री केली आहे, अशा शेतकऱ्यांना सुनावणी देवून त्यांना आधारकार्ड, तसेच सात-बारा उतारा, पेरेपत्रक घेवून सुनावणी करीता बोलवावे. पेरेपत्रकानुसार अपेक्षित उत्पादनानुसार तूर विक्री केल्याची पाहणी करावी. शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादनापेक्षा जादा तूर विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात यावी. याबाबतची कार्यवाही दिनांक 30 मार्च रोजी सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
Post a Comment