मुंबई:- पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गाला जोडणारे रस्ते दुरुस्तीसाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य रामहरी रुपनवर यांनी लक्षवेधी मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. पोटे (पाटील) बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग हे देखभाल दुरुस्तीसाठी आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये पुणे पंढरपूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. पुणे पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाणारे एकूण १३ प्रमुख जिल्हा मार्ग असून त्यांची एकूण लांबी ३०६.५५ किलोमीटर आहे. त्यापैकी १४८.३० किमी लांबीचे रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मे २०१३ मध्ये हस्तांतरित करण्यात आले असून त्यापैकी १०४ किमी लांबीचे खराब झाले असल्याने त्यावरील खड्डे भरता आलेले नाहीत. सदर लांबीमध्ये वाहतूक वर्दळ सुरळीत राहील, असा प्रयत्न करण्यात येतो. उर्वरित २०२.५५ किमी लांबीमधील डांबरी पृष्ठभागावरील खड्डे डांबरीकरणाने भरण्यात आले असून सदरची लांबी वाहतुकीस दृष्टीने सुस्थितीत ठेवण्यात आली आहे. यासाठी सन 2017-18 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 कोटी रुपये किंमतीची दोन कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे श्री. पोटे पाटील यांनी सांगितले.
Post a Comment