BREAKING NEWS

Tuesday, March 21, 2017

संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून देशाचा गतिमान आर्थिक विकास – राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) –



 स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही संसदीय पद्धती स्विकारली. तेव्हा देशात निरक्षरता, दारिद्र्य यांसारख्या अनेक समस्या होत्या. तशा परिस्थितीत पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून तेव्हा आणि त्यानंतरच्या काळात झालेल्या कार्याचे फलस्वरूप म्हणून आज आपण जगातील एक वेगाने आर्थिक विकास साधणारे राष्ट्र म्हणून पुढे आलो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.

सांताक्रूझ येथील हॉटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया टुडे परिषद 2017 मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, इंडिया टुडेचे संपादक अरुण पुरी, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले की, सुरुवातीला 397 कोटी रुपयांचे असलेले आपले वार्षिक अंदाजपत्रक आज जवळपास 17 लाख कोटीपर्यंत पोहोचले आहे. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या कालावधीत आणि सर्व लोकसभांच्या कालावधीत देशाने वेगवान आर्थिक विकास साधला आहे. प्रजासत्ताक स्थापनेच्या वेळी आपण निर्धारीत केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सर्वांनी व्यापक पातळीवर प्रयत्न केले आहेत. संसदीय लोकशाही पद्धतीत कायदे बनविण्याबरोबरच अंदाजपत्रकातील खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशावर चर्चा करण्याचे संसदेचे काम आहे. पण मागील काही वर्षात संसदेत चर्चेचा कालावधी कमी होत असून कायदे बनविण्याचे प्रमाणही घटले आहे. संसदेत तसेच विधानमंडळांमध्ये लोकांच्या प्रश्नावर अधिकाधिक चर्चा होऊन, अधिकाधिक सक्षम कायदे बनवून देशाच्या सर्वांगीण हिताचे निर्णय होणे गरजेचे आहेत. त्यातूनच आपली संसदीय लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल, असे ते म्हणाले. वादविवाद आणि विविधता ही मुलत: आपल्या देशाची वैशिष्ट्ये आहेत. पण तरीही त्यातून एकता जपण्यात आपण यशस्वी झालो आहोत. देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. विविध धर्म आणि जातीचे लोक इथे एकत्र राहतात. संविधानाने आपणास अभिव्यक्ति स्वातंत्र्य बहाल केले आहे. पण याबरोबरच आपल्या परंपरेचेही ते वैशिष्ट्य आहे.आपण वादविवाद करत असलो तरी आपण असहिष्णू नाही. त्यामुळेच मुक्त वादविवाद आणि चर्चेच्या माध्यमातून आपला समाज अधिक सशक्त होऊ शकला, असे ते म्हणाले. साधारण ५१ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाच्या कालावधीपैकी ३७ वर्षे आपण संसद सदस्य होतो. त्यापैकी २२ वर्षे विविध विभागांचा मंत्री म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. या काळात इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग या सर्वांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेही देशाच्या विकासासाठी निर्धारित लक्ष्य ठेवून काम करत असून त्यांच्यातील उर्जा, कार्यक्षमता व मेहनत देशाचा विकास गतिमान करेल,असे ते म्हणाले. आज देशातील १३० कोटी लोक हे एक देश, एक ध्वज आणि एक संविधान यांच्याबरोबर उभे आहेत. देशाची ही शक्ती आणि एकता देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.