मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
महाराष्ट्र दिन म्हणजे तो महत्वाचा दिवस जेव्हा महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांसाठी हा अभिमानाचा दिवस. प्रेरणादायी भाषणे व अन्य समारंभांद्वारे हा दिवस साजरा केला जातो, यंदा यात आणखी एक भर पडणार आहे. या 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील 5 हजार विद्यार्थ्यांशी तसेच काही तज्ञांशी संवाद साधतील आणि यासाठी निमित्त असेल ‘व्हिजन महाराष्ट्र 2025.’
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून साकारलेला कार्यक्रम ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ च्या समापन सोहळ्याच्या निमित्ताने हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली ज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील 11 सामाजिक-आर्थिक समस्या जसे दुष्काळ, भ्रष्टाचार, गरिबी यांवर मात करण्यासाठी उपाय, कल्पना सुचवण्यास आवाहन करण्यात आले. या उपक्रमातून दुहेरी उद्दिष्टे साधण्याचे लक्ष्य होते- एक म्हणजे महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्पक उपाय सुचवणे आणि दुसरे म्हणजे शासकीय धोरणांमध्ये युवकांचा सक्रीय सहभाग वाढवणे. या स्पर्धेत राज्यभरातील 11,500 विद्यार्थ्यांकडून 2500 प्रवेश आले तसेच तब्बल 6 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संबंधित तज्ञ व ऑनलाईन मतदान याद्वारे सर्वोत्तम उपाय निवडला गेला. ऑनलाईन मतदानात तब्बल 6 लाख जणांनी आपली मते नोंदवली. एप्रिलच्या सुरुवातीला निकाल जाहीर केले गेले. समापन सोहळ्यात विजेते आपल्या कल्पना मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. मुख्यमंत्री हे प्रभावी, उद्योगपती, संबंधित तज्ञ आणि 6000 विद्यार्थ्यांशी ‘व्हिजन महाराष्ट्र 2025’ बद्दल संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, ओला कॅब्सचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडेल. शिवाय बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध गायक ‘के. के.’ यांच्या सादरीकरणाने ही हा सोहळा रंगणार आहे. राज्यातील काही विद्यार्थी जे या स्पर्धेत सामील होऊ शकले नाहीत त्यांचेही उपाय, कल्पना त्यांना सादर करण्याची संधी दिली जाईल. महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वपूर्ण असलेल्या दिवशी महाराष्ट्राच्या विकासासाठी तरुणांशी, तज्ञांशी संवाद साधून विकासाचा अजेंडा अधोरेखित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत. सरकारची इच्छाशक्ती, तज्ञांचे मार्गदर्शन व तरुणांचा उत्साह पाहता उत्तम महाराष्ट्राचे स्वप्न लवकरच साकार होणार यात तिळमात्र शंका नाही.
Tuesday, April 25, 2017
1 मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘व्हिजन महाराष्ट्र 2025’ साठी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
Posted by vidarbha on 9:38:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment