BREAKING NEWS

Thursday, April 27, 2017

कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार - जिल्हाधिकारी श्री अभिजीत बांगर

अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर सर यांनी पदभार स्वीकारला 

अमरावती-

पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना तेथील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. तिथे काम करताना ही समस्या समजून घेणे व उपाय आखणे, त्याची अंमलबजावणी करणे या कामांचा अनुभव मिळाला. अमरावती जिल्ह्यातही मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यास मी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज येथे केले.
श्री. बांगर यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात काम केले असल्यामुळे आदिवासींचे प्रश्न समजून घेता आले. पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिला जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तिथे शासन यंत्रणेने पहिल्या दिवसापासून संपूर्ण क्षमतेने काम सुरु करणे हे आव्हान होते. मात्र, नियोजन व सर्वांचे सहकार्य यामुळे पदनिर्मिती, नियुक्त्या, परिसरातील गरजा ओळखून नवी यंत्रणा आकारास आणणे यातून कामाची घडी बसवता आली. त्यामुळे राज्य शासनानेही कामाची दखल घेत माझी उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी निवड केली.
 अमरावती हे विभागीय ठिकाण असून येथील प्रशासनाला मोठी परंपरा आहे. अशा जिल्ह्यात काम करायला मिळणे हे मी भाग्याचे मानतो, असेही ते म्हणाले. यापूर्वीचे जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी उत्कृष्ट कामातून येथील कामाची घडी बसवली. त्यामुळे मला काम करणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
परिचय...
श्री. अभिजीत बांगर हे अमरावती जिल्ह्याचे 37 वे जिल्हाधिकारी आहेत. ते मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून, अनेक वर्षे बार्शी येथे वास्तव्य होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे व काही काळ तेथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे.श्री. बांगर हे 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्याचप्रमाणे, त्यांनी रायगड व सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रत्येकी दोन वर्षे काम केले आहे. पालघर या नवनिर्मीत जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून 1 ऑगस्ट 2014 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला व तिथे 2 वर्षे 9 महिने काम केले. पालघर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामाबद्दल नागरी सेवा दिनी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.