राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष, पण खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे – रावसाहेब दानवे
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कामामुळे देश आणि महाराष्ट्र बदलत आहे. भाजपाला मत दिल्यास आपला विकास होईल, या भावनेने लोकांनी जात - पात - पंथ - धर्म याच्या पलीकडे जाऊन पक्षाला मतदान केले आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकातील भाजपाच्या जबरदस्त विजयामुळे अहंकार येऊ देऊ नये तर जनतेच्या सेवेचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी चिंचवड येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, भाजपाला राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले. राज्यातल्या भाजपाच्या यशामुळे संपूर्ण देशभर भाजपा कार्यकर्त्यांना आनंद झाला. विजयाचा आनंद साजरा करताना ज्या जुन्या असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रम व बलिदानामुळे पक्षाला हे आजचे चांगले दिवस आले त्या जुन्या कार्यकर्त्यांना विसरता कामा नये. त्यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. पण इतकी वर्षे सत्तेवर असताना काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने शोषण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना भाजपा सरकार जबाबदार नाही. राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात उणे असलेला शेतीचा विकास दर आता साडेबारा टक्क्यांवर गेला आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपाला राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याबद्दल आपण सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. पण अजून आपले काम संपलेले नाही. अद्याप आपले अस्तित्व नाही तेथे आपल्याला काम करायचे आहे. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षात पक्षाच्या विस्तार योजनेत सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हायचे आहे. निवडणुका झाल्यावर आता संघटनेची कामे करायची आहेत. भाजपाच्या महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदेश सचिव उमा खापरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाच्या राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी खा. राकेशसिंह, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री वी. सतीशजी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, डॉ. सुभाष भामरे, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीष बापट, भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष खा.कपिल पाटील व पिंपरी - चिंचवड शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व्यासपीठावर उपस्थित होते.
Post a Comment