भंडारा -
शाश्वत शेती हे येणाऱ्या काळात मिशन असावे. शासनाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करीत आगामी खरीपाचे नियोजन करतांना धानाची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, कृषि सभापती नरेश डहारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर व उपसंचालक माधूरी सोनोने यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांसाठी सिंचन, वीज पंपाची उपलब्धता, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात यावा. खरीपाचे नियोजन करतांना बि-बिबयाणे, रासायनिक खते, कर्जाचे पुर्नगठण, कर्ज परतफेड, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदि बांबींना प्राधान्य देण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देतांना नुकसानीसाठी मंडळस्तराचा निकष लावण्यात येतो. या निकषावर आधारित लाभ देतांना गरजु व खरे लाभार्थी वंचित राहतात अशी बाब जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, हे निकष बदलण्यासाठी व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. कृषि विभागाने राष्ट्रीय मृद व आरोग्य अभियानांतर्गत 100 टक्के मृद तपासणी करावी. ही तपासणी वेळोवेळी करणे व त्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2017-18 साठी जिल्हयाला विविध पिकांसाठी 40 हजार 135 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. जिल्हयास खरीप हंगामाकरीता 1 लाख 3 हजार 900 मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन असून 31 मार्च अखेर 27 हजार 579 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर 7 अशा भरारी पथक गठित करण्यात आले आहे.
रासायनिक खत विक्री करता थेट लाभ हस्तांतरण या योजनेचा वापर करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी आधार कार्डचा वापर करणे आवश्यक आहे. खरेदीचे व्यवहार नगदी न करता कॅशलेस पध्दतीने करण्यावर भर देण्यात येणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके तक्रार निवारण करण्याकरीता 18002334000, 07184-252464 व 252393 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा.
उन्नत शेती समृध्द शेतकरी या मोहिमेनुसार खरीप हंगाम 2017-18 चे नियोजन करण्यात आले असून पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण, प्रसार प्रसिध्दी, शेतकरी प्रशिक्षण, नाविन्यर्पूण बाबी, मृद आरोग्य व सेंद्रिय शेती, कांदा चाळ, नियंत्रित शेती आणि सुक्ष्म सिंचन या बाबीचा यात समावेश आहे. यावेळी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उपसंचालक माधुरी सोनवाणे यांनी केले. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Wednesday, April 26, 2017
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - पालकमंत्री डॉ. दीपक सावंत
Posted by vidarbha on 4:35:00 PM in भंडारा - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment