मुंबई-: केंद्र सरकारच्यावतीने युवकांच्या कौशल्य वृद्धी आणि स्वयंरोजगाराच्या संधीबाबत जास्तीत जास्त योजनांमधून भर देण्यात येत आहे. याच धर्तीवर विशेष मुलांना प्रशिक्षित करुन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने एक उपक्रम म्हणून टुगेदर संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या विक्री केंद्राचे उद्घाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे झाले.
टुगेदर संस्थेकडून विशेष गरज असलेल्या व्यक्तिंसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. देसाई म्हणाले की, विशेष मुलांनी तयार केलेले पदार्थ विक्री करुन मिळालेल्या उत्पादनातून या मुलांचे शिक्षण, व्यक्तिगत स्वच्छता, मनोरंजन, कम्प्युटर, व्यवसाय प्रशिक्षण या संस्थेमार्फत उपलब्ध करुन दिले जाते. या संस्थेकडून विद्यार्थ्यांना स्वावलंबी करुन त्यांचा कौशल्य विकास व्हावा या दृष्टीने एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम केले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे. विशेष मुलांसाठी कार्य करण्यामुळे जो आनंद मिळतो तो इतर कामांपेक्षा अधिक असतो. या कार्यासाठी संस्थेला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगून समाजानेही अशा उपक्रमांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. देसाई यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमानंतर विशेष मुलांनी तयार केलेल्या विविध पदार्थांची पाहणी करून श्री. देसाई यांनी त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास टुगेदर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती संगीता चक्रपाणी, वाडिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. वाय. के. आमडेकर, डॉ. संध्या कुलकर्णी, डॉ. समीर दलवाई, संस्थेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Post a Comment