मुंबई-
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतांना कृषी संशोधनावर भर द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालयांच्या बळकटीकरणासंबंधी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी मागील दहा वर्षात केलेल्या संशोधनाची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यशासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या प्रक्रियेत कृषी संशोधनाची भूमिका महत्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती विकसित झाली पाहिजे. कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सक्षम शेती करून दाखवली पाहिजे असेही ते म्हणाले.
कृषी विद्यापीठांनी जगभरात काय संशोधन सुरु आहे याची माहिती घेऊन त्याप्रमाणे स्वत:च्या कामात सुधारणा केली पाहिजे असे सांगून वनमंत्र्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव एकत्र तयार करून कृषी सचिवांनी त्या कामांचे मूल्यांकन करावे, दोन आर्थिक वर्षात त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही यावेळी सांगितले.
राज्यात १ जुलै २०१७ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड होणार असून सर्व कृषी विद्यापीठांनी त्यांच्याकडील उपलब्ध जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, या कामात सहभाग घ्यावा आणि वृक्ष लागवडीच्या कामात इतरांनाही प्रेरणा द्यावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
Post a Comment