BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

स्वच्छ भद्रावतीसाठी हवा तेवढा निधी देणार -- ना.मुनगंटीवार * विकासासाठी पालकमंत्र्यांनी डोलारा तलाव घेतला दत्तक * नपच्या वतीने 2 हजार लाभार्थ्यांना कचराकुंडी वाटप * लाभार्थ्यांना रमाई घरकुल धनादेश वाटप

चंद्रपूर/ प्रवीण गोंगले /-----------------            
                   


  - स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असून निरोगी पिढी देशाची संपत्ती असते. आपल्या शहरातील नागरिक निरोगी व तंदूरुस्त रहावे यासाठी भद्रावती नगर पालिकेने स्वच्छ भद्रावती, सुंदर भद्रावती, हरित भद्रावती ही योजना हाती घेतली असून स्वच्छ भद्रावतीसाठी हवा तेवढा निधी दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भद्रावती शहरातील ऐतिहासिक डोलारा तलावाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी हा तलाव दत्तक घेत असल्याची घोषणा पालकमंत्री यांनी केली.  भद्रावती नगर पालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कचराकुंडी वाटप, वृक्षरोपण व घरकुल लाभार्थ्याना धनादेश वाटप या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सुरेश धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव व चंद्रकांत गुंडावार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  दीप प्रज्वलन करुन पालकमंत्री यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तदपूर्वी पालकमंत्री यांनी राष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपन केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, डोलारा तलावाचे खोलीकरण, उत्कृष्ट सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यासाठी हा तलाव आपण दत्तक घेत आहे. तदपूर्वी त्यांनी डोलारा तलावाची पाहणी केली. तलावाची मोजणी करावी, अतिक्रमण काढावे व अतिक्रमीत लोकांना इतरत्र पूर्नवसन देण्यासंदर्भात जागा शोधावी अशा सूचना तहसिलदारांना दिल्या.
नगर पालिकेच्या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, भद्रावतीचा ऐतेहासिक वारसा पाहता आपण नगर पालिकेच्या पाठीशी सदैव असणार आहे. राज्यात जे जे चांगले आहेत ते ते आपल्या जिल्हयात असावे असा आपला प्रयत्न असून चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय, इरई नदी खोलीकरण, मामा तलावाची दुरुस्ती यासह सर्व कामे उत्कृष्ठ दर्जाचे करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हयाच्या उद्योगावरील बंदी नुकतीच उठवली असून यामुळे जिल्हयातील रोजगारात वाढ होणार आहे.

भद्रावती नगरपालिकेने स्वच्छतेसाठी अनेक योजना आखल्या असून हागणदारी मुक्त भद्रावती करण्यासाठी नगर प्रशासनाने पुढाकार घ्यावा आपण हवा तेवढा निधी देण्यास तयार आहे. बल्लारपूर नगर परिषद विदर्भातील पहिली हागणदारी मुक्त नगर परिषद आहे.  स्वच्छतेच्या सप्तपदीमध्ये सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी भद्रावती नगरपालिकेला हवा तेवढा निधी दिला जाईल असे ते म्हणाले. वृक्ष लावणे व सिंचन हे विषय आपल्या प्राधान्याचे असल्याचे सांगून धानोरा, नेवासा, तेलवासा व आमडी या बॅरेजला मान्यता देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नागरिकांना कचराकुंडी, बचत गटांना धनादेश व शौचालय बांधकाम पूर्ण करणा-या नागरिकांस प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना आमदार धानोरकर म्हणाले की, नगर पालिकेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा विकास साधल्या जात आहे. नगर पालिकेने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेला शासनाने निधी दयावा अशी मागणी त्यांनी केली.  या क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील 14 हजार विद्यार्थ्यांना बुट व मोजे देण्यासाठी आमदार निधीमधून पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता दयावी अशी विनंती त्यांनी केली. या भागात असलेली कर्नाटक एम्टा खान शासनाने सुरु करुन स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती त्यांनी केली. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नगर पालिकेने केलेल्या विकास कामाचा अहवाल सादर केला.  या कार्यक्रमास गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.