चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--

मोलमजुरी करून घरसंसाराचा गाडा ओढणाऱ्या एका मजुराच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतुन ८५.२३ टक्के गुण पटकवून घवघवीत यश संपादन केले. मजुराच्या मुलाचे नाव रोहीत आनंदराव वाघमारे असुन त्याने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतुन सर्वाधिक गुण संपादन करून तालुक्यातून अव्वल स्थान पटकविले हे विशेष.
रोहित वाघमारे हा स्थानिक अशोक कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. रोहितचे आईवडिल मोलमजुरी करतात. घरी अठराविश्व दारिद्र्य असतांना रोहितने नेत्रदीपक यश संपादन केले. रोहितला कमलदीप कोचींग क्लासचे दीपक मेश्राम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मायावती गोसावी मॅडम यांनी वेळोवेळी मदत करून मार्गदर्शन केले. रोहितला एक लहान बहिण असुन ती वर्ग ९वीमध्ये शिकते. रोहितने वेळ मिळेल तेव्हा अभ्यास केला. तसेच त्याला टेस्ट सिरीजचा मोठा फायदा झाला. त्याला पदवीधर शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकिय सेवेमध्ये जाण्याची इच्छा आहे. आपल्या यशाचे श्रेय रोहितने आईवडिल, मोठे वडिल देवानंद वाघमारे, प्रा.प्रविण शिंगारे, प्रा.प्रविण लांजेवार व दीपक मेश्राम यांना दिले. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment