BREAKING NEWS

Tuesday, September 27, 2016

सांगलीत मराठा एकजुटीचे विराट दर्शन

सांगली – तळपत्या उन्हात सांगलीत आज मराठ्यांचा महासागर उसळला आणि प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार सांगलीकरांनी अनुभवला. लाखो मराठा मोर्चेकर्‍यांनी शहराचे प्रमुख रस्ते व्यापून टाकल्याने काही काळासाठी शहर पूर्णपणे ठप्प झाले. उन्हाची तमा न बाळगता महिलाही मोठ्या प्रमाणात या मूक मोर्चात सहभागी झाल्या. गर्दीचा विक्रमी उच्चांक मोडत आणि शांतता व शिस्तीचे दर्शन घडवीत हा मूक मोर्चा ऐतिहासिक ठरला.सकल मराठा समाजाच्या वतीने आज सांगलीत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग चौक येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. विश्रामबाग चौक ते राममंदिरच्या दिशेने निघालेल्या मोर्चामध्ये लाखो मराठा शिस्तबद्धपणे सहभागी झाले होते. संपूर्ण शहरात भगवी लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळत होते. राममंदिर चौकापर्यंत येणार्‍या मोर्चाचे शेवटचे टोक मिरजनजीक होते; तर राममंदिर ते सिव्हिल हॉस्पिटल आणि राममंदिर ते काँग्रेस भवन असे तिहेरी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आजपर्यंतच्या मोर्चांच्या गर्दीचा विक्रम मोडून नवा इतिहास घडविला. मोर्चाच्या प्रारंभी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे मराठा नेते उपस्थित होते. मोर्चात अग्रभागी मुली व महिला, त्यापाठोपाठ तरुण शिस्तबद्धपणे सहभागी झाले होते. राममंदिर चौकात मोर्चा आल्यानंतर चार मुलींनी आपला आक्रोश भाषणातून व्यक्त केला. तत्पूर्वी अक्षया पाटील, चैत्राली घोरपडे, विश्‍वजा शिंदे, स्नेहल पवार, अंकिता मोहिते, सुश्मिता पै, किरण कदम, प्रियांका एडके, मोहिनी शिंदे या १० मुलींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर राममंदिर चौकात योगिता पाटील, स्नेहल पवार, कवठेपिरान येथील अश्‍विनी, विट्याची पूजा आदींनी आवेशपूर्ण भाषणांतून मराठ्यांचा हुंकार मांडला. ही ऐतिहासिक वज्रमूठ क्रांतिकारक चळवळ बनली आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य करून न्याय दिला नाही तर सनदशील मार्गाने संघर्षाचा तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी या तरुणींनी मोठ्या आवेशात दिला. या सभेचा प्रारंभ कोपर्डी येथील अत्याचारग्रस्त निर्भया, आत्महत्या केलेले शेतकरी व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आला. राष्ट्रगीताचे गायन होऊन मोर्चाचा समारोप झाला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.