BREAKING NEWS

Saturday, November 19, 2016

दक्षिणायनमधील सनातनद्वेषी अविचारी टीका, हे पुरोगाम्यांचे वैचारिक अधःपतन ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

Image result for अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

मुंबई - गोव्यामध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे दक्षिणायन अभियान १८ नोव्हेंबरपासून चालू झाले. याला उपस्थित बहुतांश वक्त्यांनी लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे बोलतांना सनातनला गाडा, अभिव्यक्तीविरोधी सनातनी राक्षसाचा वध करा, असे म्हणत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच गळा घोटला. बहुतांश वक्त्यांनी सनातनवर बिनबुडाचे आणि अविचारी आरोप करण्यातच धन्यता मानली. कोणताही पुरावा नाही, सनातनवर अद्याप एकही गुन्हा नाही, कोणत्याही न्यायालयाने अद्याप सनातन संस्थेला दोषी म्हटलेले नाही, तरीही हिंदुद्वेषामुळे सनातन संस्थेवर टीका करणे आणि सनातनला गाडण्याची भाषा करणे, हे पुरोगाम्यांचे वैचारिक अधःपतन होऊन ते किती हीन पातळीला गेले आहेत, हेच लक्षात येते, अशी परखड भूमिका एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दक्षिणायन अभियानाविषयी मांडली. 
     श्री. वर्तक यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सनातनने वापरलेल्या दुर्जनांचा नाश या शब्दांविषयी खूप आरडाओरड झाली; पण आज दक्षिणायनच्या पुरोगामी व्यासपिठावरून रावसाहेब कसबे यांनी सनातन विषारी आहे. या विषारी प्रकाराला गाडावेच लागते. अभिव्यक्तीच्या विरोधात असलेल्या या राक्षसांचा वध करणे आवश्यक आहे, असे म्हटले. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांचे गांधीवादी(?) कुटुंबीय बसलेल्या व्यासपिठावरून गाडा आणि वध करा अशी चिथावणीखोर भाषा केली जाते आणि हे पुरोगामित्वाचा बुरखा घातलेले अधोगामी शांत रहातात. हेच का पुरोगामीत्व ? हाच का विवेक ? हेच का ते दक्षिणायन ? 
     या वेळी हमीद दाभोलकर यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागील प्रवृत्तीचे उगमस्थान गोव्यात आहे असे म्हटले, तर या हत्या करणारे सनातनशी संबंधित आहेत असे मेधा पानसरे यांनी म्हटले. सनातनला हेतूपूर्वक लक्ष्य करणार्‍या या विधानांविषयी सनातन कायदेशीर सल्ला घेत आहे. खरेतर अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यात असलेले दाभोलकरांच्या हत्येचे उगमस्थान लपवण्यासाठी तर हमीद दाभोलकर असे म्हणत नाहीत ना, अशी शंका येते. याविषयी हमीद दाभोलकर का बोलत नाहीत ? टोलमाफीच्या आंदोलनात पुढाकार घेतल्याने पानसरे अनेकांच्या नजरेत आले होते. त्यामुळे त्यांची हत्या करणारे टोलमाफियांशी संबंधित नाहीत; पण सनातनशी संबंधितच आहेत, हा शोध मेधा पानसरे यांनी कोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून घेतला, हेही त्यांनी एकदा जनतेला सांगावे. सनातनला गाडण्यासाठी बाहेरील राज्यातील गावगुंडांना बोलावून गोव्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचे कारस्थान गोमंतकीय कदापि सहन करणार नाहीत, असेही श्री. वर्तक यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.


फोटो - फाईल 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.