अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या संस्थेची एफ्.सी.आर्.ए. नोंदणी
रहित केल्याविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांचे अभिनंदन ! - सनातन संस्था
मुंबई - मुदतीमध्ये परवाना नूतनीकरणाचा अर्ज सादर करण्यामध्ये हलगर्जीपणा करणार्या राज्यातील एक सहस्रांहून अधिक सरकारी आणि बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांची (एन्जीओची) परकीय देणगी नियम कायद्याखालील (एफ्.सी.आर्.ए.) नोंदणी रहित करण्याचा बडगा केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच उगारला. त्या अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र संस्था कारवाईच्या कक्षेत आली आहे. या कारवाईमुळे या संस्थेला परदेशी देणगीदारांकडून मिळणार्या देणग्या पुढील पाच वर्षांसाठी रोखल्या गेल्या आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या संस्थेच्या विरोधात सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी गृहखात्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या होत्या. एक दशकाहून अधिक काळ जमाखर्च आणि ताळेबंद सादर न करणे, एफ्.सी.आर्.ए. देणग्यांविषयी खोटी माहिती धर्मादाय आयुक्तांना सादर करणे, वार्तापत्र प्रकाशित करत असल्याने एफ्.सी.आर्.ए. नोंदणीसाठी पात्र नाही, ही माहिती लपवून एफ्.सी.आर्.ए.ची नोंदणी मिळवणे यांसह नुकताच धर्मादाय आयुक्तांनी दिलेला आर्थिक गैरव्यवहाराचा अहवाल या सर्व गोष्टींचे कागदोपत्री पुरावे अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले होते. देशाचे कायदे धाब्यावर बसवणार्या या संस्थेवर कारवाई केल्याविषयी केंद्र शासनाचे अभिनंदन करतो. लवकरच दोषी विश्वस्तांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल, याविषयीही आम्हाला विश्वास वाटतो, असे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment