हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन !
पुणे - २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद (वाघोली, जिल्हा पुणे) येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पहाता यंदाच्या वर्षी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरांतून वाढता विरोध होतांना दिसून येत आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून व्यसनाधीनतेला चालना मिळत असून हा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक राजधानी म्हणवणार्या पुणे शहराला कलंकच आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना या महोत्सवाच्या विरोधात कृतीशील होत आहेत. हिंदु संस्कृती भ्रष्ट करणारा आणि भारतीय युवकांना पाश्चात्त्य संगीताच्या नावाखाली व्यसनाधीनतेकडे नेऊ पहाणारा हा महोत्सव रहित व्हावा, या मागणीसाठी १७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
ह.भ.प. मंचक महाराज कराळे (परभणीकर) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्री कसबा गणपति मंदिरापासून मोर्च्याला प्रारंभ झाला. या वेळी ‘सनबर्न’ कार्यक्रमाच्या विरोधात उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या, तसेच या कार्यक्रमाच्या विरोधात समस्त नागरिकांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठीकाणी मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेश मुठे यांना निवेदन देऊन हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली. पंचायत समितीचे सदस्य संतोष भाडळे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. मुकुंद म्हासाळ, भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. गायत्री काळभोर, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अधिवक्ता गणेश म्हस्के आदी मान्यवरांसह २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू या मोर्च्यात सहभागी झाले होते. फेसबूकच्या माध्यमातून मोर्च्याचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले होते.

Post a Comment