मोईन खान / परभणी - :
रबी हंगामातील पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांनी त्वरीत पूर्ण करावे तसेच मुद्रा योजनेअंतर्गत बॅकांनी पात्र व्यक्तींना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बॅकर्स समितीची आढावा बैठक झाली. यावेळी रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक आर डब्ल्यु साळुंके, नाबार्डचे विकास अधिकारी प्रीतम जंगम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम खरटमल, एस.बी.एच.चे जिल्हा समन्वयक सुनिल हट्टेकर, 'आरसेटी'चे संचालक गिरीष खवसे तसेच विविध बॅकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, स्वयंरोजगाराशी निगडीत सर्व विभाग, यंत्रणा तसेच बॅकांमार्फत मुद्रा योजनेचा प्रचार-प्रसार करून लाभार्थ्यापर्यत या योजनेची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत बॅकांनी पात्र व्यक्तींना कर्ज उपलब्ध करून द्यावे व स्वयंरोजगाराशी निगडीत सर्व विभाग व यंत्रणा तसेच 'आरसेटी'सारख्या प्रशिक्षण संस्थांनी या व्यक्तींना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातील आवश्यक प्रशिक्षण देऊन सक्षम करावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचतगट कार्यरत असून या बचतगटांना बॅकांनी कर्जपुरवठा करून अधिक सक्षम बनवावे असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी यावेळी केले.
खरीपासाठी यंदा 1304 कोटी रूपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. 1408 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून खरीप पीक कर्जाचे 108 टक्के वाटप झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विविध महामंडळांकडील कर्जप्रकरणे, स्टॅण्डअप इंडिया यासंदर्भातही आढावा घेण्यात आला.
उद्योजक होण्याची आशा बाळगणा-या तरुणांसाठी व व्यावसायिकांसाठी स्वयंरोजगाराशी निगडीत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा ग्रामोद्योग, रेशीम विकास, जिल्हा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (SBH), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच विविध महामंडळांचे व्यवस्थापक, माविम यासारखे विविध विभाग व अन्य यंत्रणांमार्फत मुद्रा योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी गावा-गावांमध्ये मेळावे, कार्यशाळा, प्रशिक्षण, चर्चासत्र याअंतर्गत तरुण, उद्योजकांना माहिती, मार्गदर्शन करणे, सल्ला देऊन कौशल्य विकासामध्ये भर घालण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. सर्व बॅकांनी मुद्रा योजनेसंदर्भात भित्तीपत्रके, हस्तपुस्तिका, माहिती पुस्तिका, जाहिरात फलक तयार करून ते बॅकांमध्ये दर्शनी भागामध्ये लावण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.


Post a Comment