नागपूर-:
कायद्याची निर्मिती करताना त्यावर तटस्थपणे आणि शांतपणे विचारविनिमय करुन तो कायदा अधिकाधिक समाजहिताचा होण्याच्या दृष्टीने विधानपरिषद महत्वपूर्ण योगदान देत असते. या सदनाला समाजातील विचारवंत तसेच प्रज्ञावंत सदस्यांची मोठी परंपरा लाभली असून आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने परिषदेतील सदस्यांनी अनेक शासकीय योजनांना लोकाभिमुख बनविण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे संसदीय लोकशाहीत विधानपरिषदेचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानभवनातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्वपूर्ण योगदान’ या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11 विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. नाईक –निंबाळकर म्हणाले की, निवडणुकांच्या राजकारणात ज्यांना विधीमंडळात काम करण्याची संधी मिळत नाही पण जे आपले ज्ञान, अनुभव आदींच्या सहाय्याने राज्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतील अशा व्यक्तींसाठी विधानपरिषद हे महत्वाचे सांविधानिक व्यासपीठ आहे. ‘विधीमंडळात प्रवेश करण्याचे मागचे दार’ असा होणारा उल्लेख पूर्णत: चुकीचा असून विधानपरिषदेतील अनेक मान्यवर सदस्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण चर्चांनी राज्याच्या विकासात्मक घडामोडींमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.
आजच्या तरुणांची विविध विषयांवरील मते महत्वपूर्ण असून ती लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. राजकारणाला चांगल्या, सुशिक्षित आणि संवेदनशील लोकांची गरज आहे. तरुणांमधून असे नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. राजकारणाविषयी असलेले गैरसमज दूर करुन तरुणांनी राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अवर सचिव सुनिल झोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. एसएनडीटी विद्यापीठाची विद्यार्थिनी मेहफुजा शेख हिने आभार मानले.

Post a Comment