नवी देहली –
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात जिल्हाधिकारी जे.के. जैन यांनी एक नोटीस जारी केली आहे. यामध्ये ‘युवकांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याऐवजी त्या दिवशी आई-वडिलांची पूजा करावी. जिल्ह्यातील सर्व शालेय आणि सामाजिक संस्था यांमधून १४ फेब्रुवारी हा दिवस आई-वडिलांच्या पूजेचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, तसेच घर, गल्ली, गाव आणि शहरे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या संकल्पनेला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, असेही म्हटले आहे.
जिल्हाधिकारी जैन म्हणाले की, आमची अपेक्षा आहे की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे तरुण आणि विद्यार्थी आईवडील अन् गुरु यांचा आदर करण्यास शिकतील, तसेच भारतीय संस्कृतीचे महत्त्व वाढेल. जेव्हा मुले आईवडिलांचा सन्मान करू लागतील, तेव्हा अन्यही स्वतःहून ते शिकतील.
काँग्रेसने या नोटीसीला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता पंकज चतुर्वेदी यांनी म्हटले की, जिल्हाधिकारी हे रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांचे धोरण राबवत आहे. भारतातील प्रत्येक मुलगा वर्षातील प्रत्येक दिवस आईवडिलांचा सन्मान करतो. त्यामुळे यासाठी कोणत्याही वेगळ्या दिवसाची आवश्यकता नाही. संपूर्ण देशाला माहिती आहे की, ‘व्हॅलेंटाईन डे’चा कोण आणि कशासाठी विरोध करतात ?

Post a Comment