आज पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे लोक हिंदु धर्म-संस्कृती यांना बुडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लोक परकीय साहाय्य घेऊन हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आपल्याला सामूदायिक कृती करावी लागेल. हिंदुत्वाचे जे कार्य करतात अशी गणेशोत्सव मंडळे, तरुणांची मंडळे, सामाजिक मंडळे यांतील तरुणांमध्ये हिंदुत्वाचे बीज रोवण्यासाठी प्रयत्न करा, असे मार्गदर्शन सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी केले. ते गोकुळ-शिरगाव येथील श्री भगवती मंगल कार्यालयात झालेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे पश्चिपम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या अधिवेशनासाठी बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतून ९० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी सातारा येथील पू. विठ्ठल स्वामी यांचीही वंदनीय उपस्थित होती, त्यांचा सन्मान डॉ. मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांचा सत्कार सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे यांनी केला, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सन्मान सौ. अरुणा पेडणेकर यांनी केला, तर श्री. मनोज खाडये यांचा सत्कार कोल्हापूर येथील हिंदु धर्माभिमानी श्री. गोविंद देशपांडे यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.


Post a Comment