शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रसंगी सत्तेवर लाथ मारू मात्र आता माघार हटणार नाही. सरकारविरूध्द आता आरपारची लढाई असल्याची घोषणा स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी केली.
स्वाभिमानीची आत्मक्लेश यात्रेचा आज आठवा दिवस होता. मानखुर्द येथून सकाळी यात्रेला सुरूवात झाली, सायन माटुंगा मार्गे परेल येथे पदयात्रा येऊन पोहचली. यावेळी बोलताना खास. राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या आठ दिवसापासून आम्ही पुणेहून मुंबईत पायी पदयात्रा करत आज येथे आलो आहोत. सरकारला अजूनही जाग आलेली नाही. आमच्या मागण्या योग्य आहेत. शेतकरी कर्ज मागतो, भीक नाही मागत. किती अन्याय आम्ही सहन करायचे, जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर सत्ता काय कामाची? शेतकरी चळवळीत काम करताना माझा आत्मसन्मान कायम ठेवलाय, म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या पदयात्रेत सामिल झाले आहेत. सरकारला सत्तेची नशा चढली आहे. या शेतकरी विरोधी सरकारला चांगलाच धडा शिकवू. रस्त्यावरची लढाई आता सुरू केली आहे. येथून पुढे एका नव्या पर्वाला सुरूवात होईल. आत्मक्लेश यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला आजपासून सुरूवात झाली. ही यात्रा सकाळी चेंबूरहून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली. या यात्रेमुळे पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यापूर्वी आत्मक्लेश यात्रा सुरू असताना वाशी येथे राजू शेट्टी यांना रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना सलाईन लावावे लागले होते. सुमारे एक तासाच्या विश्रांतीनंतर राजू शेट्टींनी पुन्हा आपल्या यात्रेस सुरूवात केली व कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळेत आपण यात्रा पूर्ण करणार असून राज्यपालांना भेटून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमुक्तीचे अर्ज त्यांना देणार असल्याचा निश्चय त्यांनी बोलून दाखवला आहे. यावेळी रविकांत तुपकर, प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, माणिक कदम, रसिका ढगे, राजू तळसंगी आदी उपस्थित होते. आजची जेवणाची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली होती. खर्डा भाकरीचा आस्वाद खा. शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला. सर्व राज्यभरातून शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा मोर्चा प्रथमच मुंबईत प्रथमच निघत आहे. या पार्श्वभुमिवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment