प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---
चंद्रपूर जिल्ह्यात आज अवैध दारूविक्रेत्यांनी कहर केलाय. कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे अवैध दारूविक्रीला विरोध करणा-या एका जोडप्यावर अवैध विक्रेत्यांनी acid हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर अवस्थेतील या जोडप्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचा दारूबंदी समर्थक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. दारूबंदीच्या सैल अंमलबजावणीच्या विरोधात श्रमिक एल्गार संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
----------------------------चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीला १ एप्रिल २०१६ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र दारूबंदी झाली असली तरी त्यासाठी आवश्यक कायद्याचे कठीण कवच अंमलबजावणी यंत्रणेला मिळालेले नाही. त्याचाच परिणाम म्हणजे जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोकाट झाले आहेत. पोलिसांची छापेमारी थंडावली आहे. कागदावर अस्तित्वात असलेली दारूबंदी आपला भेसूर चेहरा दाखवीत आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर या गावी संकेत सिडाम या अवैध दारूविक्रेत्याची दारू याच गावातील वाढई दाम्पत्त्याने पकडून दिली होती. या घटनेचा राग मनात ठेवत जामिनावर सुटून आलेल्या संकेत सिडाम याने गुरुवारी रात्री घराच्या अंगणात झोपलेल्या संगीता आणि नामदेव या वाढई दाम्पत्त्यावर acid हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्याने घाबरलेल्या आणि जखमी झालेल्या या दाम्पत्त्याला आधी गडचांदूर येथील रुग्णालय तर नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील संगीता वाढई यांना अधिक जखमा असून पोलिसांनी घटनेची पुष्टी केली आहे.
दरम्यान चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातील दारूबंदी यशस्वी व्हावी यासाठी राज्य शासनाने काहीही ठोस केले नसून त्यामुळेच अवैध दारूविक्रेत्यांचे फावले असल्याची टीका दारूबंदी आंदोलनाच्या प्रमुख Adv. पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे. जमिनात वाढ करणे, शिक्षेची तरतूद वाढविणे , दारूबंदी विरोधात एकवटलेल्या महिलांना सुरक्षा देणे या मुद्यावर शासन अपयशी ठरले असून साधी वर्षभराची आढावा बैठक घेणे या शासनाला गरजेचे वाटले नसल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. सैल अंमलबजावणीच्या विरोधात आपण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा दारूबंदी आंदोलनाच्या प्रमुख Adv. पारोमिता गोस्वामी यांनी दिला आहे.
दरम्यान दारूबंदी किंवा अन्य दुस-या एखाद्या गुन्ह्यात acid हल्ल्याची ही पहिलीच घटना असून या घटनेने पोलिस यंत्रणा हादरली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून घटनेचे गांभीर्य पाहता त्वरेने तपास चालविला आहे....
Post a Comment