कोल्हापूर--- कॉ. गोविंद पानसरे हत्या
प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतरही कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात
बंदीस्त असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना परिसरात फिरण्यास
प्रतिबंध करण्यात येत आहे, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी २७ जुलै
या दिवशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर न्यायालयाने
कारागृह प्रशासनास नोटीस बजावली होती. त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी
कारागृह अधीक्षक ३० ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित होते. यावर श्री.
समीर गायकवाड यांचे म्हणणे आणि अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांचा
युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते
सायंकाळी ६ या वेळेत श्री. समीर गायकवाड यांना कारागृह परिसरात फिरण्यास
अनुमती देत असल्याचे सांगितले. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर
ही सुनावणी चालू आहे. पुढील सुनावणी १३ सप्टेंबर या दिवशी होईल, असे
न्यायाधिशांनी घोषित केले.
३० ऑगस्ट या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिशांनी श्री.
समीर गायकवाड यांना 'तुमची काय तक्रार आहे ?', अशी विचारणा केली. यावर
श्री. समीर गायकवाड यांनी 'मला इतर बंदीवानांशी बोलू दिले जात नाही, तसेच
बाहेर फिरण्यास अनुमती देण्यात येत नाही', असे न्यायाधिशांना सांगितले.
यावर न्यायाधिशांनी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांना 'समीर गायकवाड यांना
उच्च सुरक्षा द्या', असे तुमचेच आवेदन होते, असे सांगितले. यावर अधिवक्ता
श्री. समीर पटवर्धन युक्तिवाद करतांना म्हणाले, "उच्च सुरक्षा, याचा अर्थ
त्याला एकांतवासाची शिक्षा असे नाही. श्री. समीर गायकवाड यांना अटक करून एक
वर्षांचा कालावधी होत आला असल्याने आता परिस्थिती बरीच पालटली आहे.
त्यामुळे या बाबींचा विचार करून श्री. समीर यांना कारागृह परिसरात फिरण्यास
अनुमती देण्यात यावी." युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी वरील निर्णय दिला.
Post a Comment