मुंबई -
राज्यातील पंचायत समित्या, जिल्हापरिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका नोव्हेंबर-2016 ते मार्च-2017 या कालावधीत होत आहेत. या निवडणुकांच्या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यामध्ये लोकराज्य मासिक महत्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी काढले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-2016 च्या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, माहिती सचिव तथा महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती संचालक अजय अंबेकर ,देवेंद्र भुजबळ यावेळी उपस्थित होते.
लोकराज्य मासिकाद्वारे या निवडणुकीचा वृत्तांत या पुढील अंकामध्येही समाविष्ट करण्यात येईल, जेणेकरुन निवडणुकीबद्दलची सजगता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माहिती सचिव तथा महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी केले.
राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगर पंचायतींच्या निवडणूकांबद्दलची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांच्या मुलाखतीचा समावेश अंकात करण्यात आला आहे. नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची संपूर्ण माहितीही या अंकात देण्यात आली आहे.
संविधान दिवसानिमित्त “परिवर्तनाचे साधन” हा डॉ.बबन जोगदंड यांचा ज्येष्ठ पंचागकार दा.कृ.सोमण यांचा “दीपोत्सव” या विषयावरील लेख तर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा.विद्याधर वालावलकर यांचा फटाके जरा सांभाळून, अजय वाळिंबे यांचा “समृध्दीच्या स्मार्ट दिशा” हे आणि इतर लेखही अंकात समाविष्ट करण्यात आले आहे.
हा अंक सर्व जिल्हा माहिती कार्यालयांमध्ये तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-400 032येथे उपलब्ध आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून वार्षिक वर्गणी रुपये 100/- आहे.
लोकराज्य मासिकाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून ऑडिट ब्यूरो ऑफ सक्यूर्लेशन या संस्थेने जून-2015 ते डिसेंबर-2015 या कालावधीसाठी लोकराज्य मासिकाचा खप 3 लाख 88 हजार असल्याचे प्रमाणित केले आहे. गेल्या तीन महिन्यात लोकराज्यचे वर्गणीदार सुमारे 50 हजारांनी वाढले असून राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे ते प्रभावी माध्यम ठरत आहे.
Post a Comment