
जळगाव –
रामराज्याची स्थापना करून समस्त ब्रह्मांडापुढे राज्यकारभाराचा आदर्श ठेवणारे प्रभु श्रीराम हे ग्रामदैवत असलेल्या जळगावच्या सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांनी रामराज्याप्रमाणेच आदर्श हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आणि शेवटचा श्वास असेपर्यंत हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी लढणार ! अशी शपथ घेतली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदानावर घेण्यात आलेल्या जाहीर धर्मजागृती सभेत जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्चा जयघोष केला. या सभेत श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर, सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव अन् हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक
श्री. सुनील घनवट यांनी तेजस्वी वाणीने उपस्थितांमध्ये हिंदुत्वाची चेतना निर्माण केली.
या ऐतिहासिक सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. या वेळी जय भवानी, जय शिवाजी या जयघोषात आमदार
श्री. राजासिंह ठाकूर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्तींनी वेदमंत्रपठण केल्यावर वातावरण चैतन्यमय झाले.
सहस्रावधी उपस्थिती लाभलेल्या हिंदु धर्मजागृती सभेमध्ये उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीने धर्माभिमान्यांमध्ये प्रखर हिंदुत्वाची ज्योत पेटवली.
Post a Comment