वाशिम ( रिसोड/ महेंद्र महाजन)
जिल्ह्यातील नागरिकांना कमी
कालावधीत जुन्या अभिलेखांच्या प्रती मिळाव्यात, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात एनी टाईम डॉक्युमेंट्स मशिन (एटीडीएम) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामधून एटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या मशिनमधून सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी पाच प्रकारच्या अभिलेखांच्या प्रती मिळविता येणार आहेत.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील नागरिकांचे सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी अभिलेख एटीडीएम मशिनद्वारे मिळविता येतील. हक्क नोंदणी रजिस्टर, पेरेपत्रक व सातबाराची प्रत मिळविण्याकरिता गट नंबर किंवा सर्व्हे नंबर माहित असणे आवश्यक आहे. त्याधारे आपल्याला आवश्यक सातबारा शोधून त्यांची प्रिंट घेता येईल. याचप्रमाणे गट नंबर, सर्व्हे नंबर किंवा फेरफार क्रमांक टाकून फेरफार अभिलेखाची प्रत मिळविता येईल. तसेच संबंधित वर्षाच्या माहितीद्वारे कोतवाल बुक नक्कल मिळविता येईल. अभिलेखाची एक प्रत मिळविण्यासाठी मशिनमध्ये फक्त २० रुपये रोख स्वरुपात जमा करावे लागतील. एका प्रतीस २० रुपये याप्रमाणे अभिलेखांच्या कितीही प्रती एका वेळेस काढता येतील.
जिल्ह्यातील नागरिकांना अभिलेखांच्या प्रती सहज व कमी कालावधीत उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कल्पनेतून ‘एटीडीएम’मशिन जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४३ लक्ष अभिलेख अपलोड करण्यात आलेले आहेत. एटीडीएम मशिनच्या माध्यमातून अभिलेख वितरीत केले जाणार असल्याने नागरिक व प्रशासनाच्या वेळेतही बचत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले. ‘एटीडीएम’मशिनचा वापर करणे अतिशय सोपे आहे. या मशिनची कार्यप्रणाली एटीएम मशिनशी मिळती-जुळती आहे. त्यामुळे नागरिकांना एटीडीएम मशिनचा वापर सहजपणे करता येईल, असे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांनी सांगितले.
Post a Comment