नाशिक :-
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.२६) रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात सुरभी, पुणे निर्मित ‘बोलु कवतिके’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य क्षेत्रास दिलेले योगदान आणि मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेले परिश्रम विचारात घेवून २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मुक्त विद्यापीठाच्या वतीने येत्या रविवारी (दि.२६) रोजी सुरभी, पुणे निर्मित ‘बोलु कवतिके’ हा मराठी भाषेचा महिमा सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमात अभिवाचन तसेच नाट्यगीत, भारुड, संतरचना गवळण, भावगीते, चित्रपट संगीत, अभंग, लोकगीत, स्फुटे, ओव्या, लावणी, लोकगीते, काव्यरचना याबरोबरच गीतरामायणातील पदे, नाट्यपदे यावेळी सदर करण्यात येणार आहेत. वि.स.खांडेकर, ना.सी. फडके, आचार्य अत्रे, व्यंकटेश माडगुळकर, गदिमा, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांत शेळके, बा.सी. मर्ढेकर यांपासून सुरेश भट, आरती प्रभू, ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित कलाविष्कार नाशिककरांना यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. एकूणच मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठीची बीजे नव्या पिढीत रुजविण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे.
ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, अनुराधा मराठे, योगिता गोडबोले, श्रीरंग भावे, अशोक काळे यासारखे दिग्गज येणार असून प्राजक्ता राज (अत्रे) नृत्ये सादर करतील. केदार परांजपे यांचे संगीत संयोजन असून तुषार दळवी, मधुर वेलणकर, प्रवीण जोशी हे अभिवाचन करणार आहेत. या विशेष कार्यक्रमासाठी प्रवीण जोशी यांनी संहिता लेखन केले आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क असून या कार्यक्रमास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि विद्यार्थी कल्याण व बहि: शाल विभागाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.
Post a Comment