मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थीनींचे लैगिक शोषण होत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शासनाकडून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे, पंरतू अशा घटना अतिशय गंभीर स्वरुपाच्या असून अशा प्रकारचे कृत्य करणारी कोणतीही व्यक्ती, शाळा, संस्था आढळल्यास यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. अशा घटनांची तक्रार विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग यांना देण्यात यावी त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट काढण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी आज विधानसभेत स्पष्टपणे सांगितले.
अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीवर होत असलेल्या अत्याचाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना या गंभीर स्वरुपाच्या असून आजच्याच प्रश्नोत्तरामध्ये ठाणे जिल्हयातील ज्ञानमाता या आदिवासी शाळेतील फादरकडून मुलींची गैरवर्तन करीत असल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आलेली आहे. परंतू, संबंधित फादर विरुध्द कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे फादर विरुध्द कारवाई करण्याबाबत गृह विभागाला सुचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये होणाऱ्या गैरवर्तना प्रकाराबाबत एखादया विद्यार्थीनीने अथवा तिच्या पालकांनी शासनाच्या वेबसाईटवर तक्रार केल्यास दोषी व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा प्रकरणात तक्रारकर्त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल असे स्पष्ट करताना तावडे म्हणाले की, अशा घटनांमध्ये विद्यार्थी आणि पालकांना समुपदेशन करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना अधिक प्रबोधित करण्याबाबत आमचा विभाग काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment