मुंबई –
राज्यातील अधिस्वीकृतीधारक (अॅक्रिडिटेड) पत्रकारांना पथकर माफ (टोलमाफी) केला जाईल आणि या आदेशाची प्रत लवकरच संबंधित सचिवांना देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसह सर्व दैनिकांतील पत्रकारांना पथकर माफी करावी, या मागणीचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे दिले होते. महसूलमंत्री पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारांशी बैठक झाली. या वेळी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पथकर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच पुढील काळात सर्वच पत्रकारांना पथकर माफ करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पत्रकार संरक्षण कायदा या अधिवेशनात पारित करावा, अशी मागणी मंत्री महोदयांकडे करण्यात आली.
या मागणीचा आम्ही या अधिवेशनात नक्कीच विचार करू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. या निर्णयाचे राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, यासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.
Post a Comment