चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
दिवस रात्र घाम गाळुन शेतकरी शेतातला माल पिकवुन घरी आणतो. परंतु अगोदरच जर्जर झालेला शेतकरी, अशात त्याच्या शेतमालाला बाजार समितीमध्ये भाव नाही. तर दुसरीकडे शासन शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करणार यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये आणुन ठेवलेली तुर नाफेड अधिकाऱ्यांनी गेल्या एक- दीड महिन्यापासुन मोजमाप न केल्याने त्या तुरीचे पोते प्रखर उन्हामुळे फुटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तुर काळी पडत असुन अतोनात नुकसान होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नाफेड अधिकारी शेतकऱ्यांची चांगली तुर रीजेक्ट करीत असुन नाफेड अधिकाऱ्यांच्या अशा अरेरावी पुढे चांदुर रेल्वे बाजार समिती नतमस्तक झाल्याचे दिसत आहे.
चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डिसेंबर २०१६ पासुन नाफेडने तुर खरेदी सुरू केली. वास्तविक पाहता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांची तुरी शेतातच उभी असते. त्यामुळे त्या काळात सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली तुर नाफेडला दिली. त्यामध्ये नाफेड अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे सगळीच तुर क्वॉलीटी न पाहता खरेदी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता जेव्हा कास्तकाराची तुर बाजार समितीत आली तर मधेच 'गोडाऊन हाऊसफुल्ल'चे कारण देत तुर खरेदी बंद केली होती. त्यामुळे बाजार समितीच्या मोकळ्या जागेवरच शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तुर उन्हाचा तडाखा सहन करीत मागिल एक ते दीड महिन्यांपासुन पडुन आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या तुरीचे पोते उन्हामुळे फुटुन ते माती सोबत मिश्रीत झाले. तसेच उन्हामुळे ही तुर काळीसुध्दा पडुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र नाफेड अधिकाऱ्यांना त्याचे काहीच सोयरे सुतुक नाही. याउलट दिवसभर शेतकऱ्यांना चाळणी मारायला लावुन संध्याकाळी तीच तुर रीजेक्ट करण्याचा प्रकार नाफेडने चालवला असला तरी बाजार समिती सभापती व सचिवांचेही काहीही एैकायला तयार नाही. कोणी शेतकरी या बाबत विचारायला गेला असता अधिकारी शेतकऱ्यांच्या अंगावर धावुन जात असल्याचेही अनेक प्रकार याठिकाणी घडले आहे. नाफेड अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन मागील एक - दिड महिन्यांपासुन बाजार समितीत दररोज या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांची बाचाबाची होत आहे. तरीही मात्र स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सचिव या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई दिसत नाही आहे. आता तरी अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
Post a Comment