चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय अधिक सशक्त करण्याच्या दृष्टीने अधिक कडक कायदे करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्यचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
दारु सोडा, संसार जोडा या अभियानातंर्गत प.पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना तालुका राजूरा यांनी भव्य दारु व्यसनमुक्ती महामेळावा आयोजित केला होता. महिला–मातांच्या प्रचंड उपस्थितीतील या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ना मुनगंटीवारांनी हा निर्धार व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर व्यसनमुक्तीचा पुरस्कार करणारे शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी संतोष महाराज, महाराष्ट्र भूषण डॉ.सौ.राणी बंग, यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार ॲड.संजय धोटे, माजी आमदार एकनाथराव साळवे, प्रभाकरराव मामुलकर, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, सर्चग्रामच्या समाजसेविका सौ.आरती बंग, चंदू पाटील मारकवार आदी उपस्थित होते.
दारुबंदी झालेल्या जिल्हयातही सध्या काय सुरु आहे याची मला जाणीव आहे. पण हे चित्र बदलणार आहे. तुमचे असे आयोजन, समर्थन एका बाजुने सुरु ठेवा. आगामी अधिवेशनात दारु बाळगणे, वाहतूक करणे, अवैध व्यवसाय या संदर्भात अधिक सक्षम कायदे बनविण्याचा माझा संकल्प आहे. त्यामुळे आता एकदा सापडलेले वाहन पोलीस ठाण्याच्या बाहेरच पडणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित नागरिकांना या आयोजनाचा उत्साह व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग बघून आपण आनंदी झाल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद लढण्याचे बळ देते असे सांगून राजु-यात मागणी केल्यावर व्यसनमुक्तीचे भव्य सभागृह बांधू, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचले. दारुचा खर्च मुलीच्या शिक्षणासाठी करा, असे ते सांगायचे. क्षणिक नशेऐवजी आयुष्याचा दीर्घ आनंद घ्या, असे आवाहन त्यांनी केले. व्यसनी लोकांचा माझ्यावर प्रचंड रोष आहे. मात्र माझा राग करणे हा व्यसनातून बाहेर पडण्याचा पहिला टप्पा आहे. पोलिसांच्या दोन वर्षातील आकडेवारीने नशेत दारु पिऊन होणारे अपघात, पोलीसात होणा-या गुन्हयांची नोंद कमी झाल्याचे पुढे आले आहे. ही आकडेवारी जिल्हयात या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दाखवून देते, असे सांगून त्यांनी आपल्या जिल्हा विकासाच्या त्रीसूत्रीचा पुनरुच्चार केला. रोजगारयुक्त जिल्हा, हगणदारीमुक्त जिल्हा, व्यसनमुक्त जिल्हा हा आपला संकल्प असून यासाठी व्यसनमुक्तीच्या आंदोलनातील सहभागी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सतीष कौरासे यांनी केले.
Post a Comment