लातूर-
जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येणारे पाण्याचे काम हे महत्त्वपूर्ण असे राष्ट्रीय काम आहे. आपणास हे काम करण्याची संधी मिळाली आहे, असे समजून हे काम करावे. पाणी जेथे असते तेथे समृद्धी असते असे म्हटले जाते. त्यासाठीच येत्या तीन वर्षात राज्यातील चाळीस हजार तलाव पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. लातूर जिल्हा राज्यातील पहिला बेघरमुक्त जिल्हा करा, असे आवाहन करुन, लातूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावरील (फ्लॅगशीप) योजना उत्कृष्टरित्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचेही या बैठकीत अभिनंदन केले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार, खासदार डॅा. सुनील गायकवाड, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार सर्वश्री त्र्यंबक भिसे, बसवराज पाटील, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, मुख्यमंत्री कार्यालयातील अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, लातूरचे उपमहापौर देवीदास काळे, औरंगाबाद विभागीय आयुक्त डॅा. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, तसेच विविध विभागांचे प्रमुख, अंमलबजावणी यंत्रणांतील अधिकारी आदींची उपस्थिती होती.
जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत मिशन, पीक कर्ज पुनर्गठन, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, तूर खरेदी, लातूर शहरातील पाणी पुरवठा, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वंकष आढावा घेतला.
यावेळी ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या फ्लॅगशीप योजनांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. ही अतिशय चांगली कामगिरी आहे. काही योजनांत मागे राहिलेल्या तालुक्यांनाही आता पुढे गेले पाहिजे. या तालुक्यांना सोबत घेण्यासाठी इतरांनी प्रयत्न करावेत. लातूर जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियानात दुष्काळानंतरच्याच एका वर्षात विक्रमी कामगिरी करत सर्वाधिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासनाने एखादी बाब मनावर घेतली, तर काय घडू शकते हे दाखवून दिले आहे. सरकारच्या योजना या ग्रामीण भागातील चित्र बदलविण्यासाठी असतात. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी कामांमुळे आता राज्यभरात चांगले चित्र निर्माण झाले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे खरीप,रब्बीचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यानी तीन-तीन पिके घेतली. पिण्याचे पाण्याचे संकट टळले, लातूरसह अनेक ठिकाणी टॅंकरमुक्ती साध्य झाली. यापुढे जाऊन आता राज्यात “गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांला तलावातील गाळ मिळाल्यास, त्याची जमीन सुपीक होईल, आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता निर्माण होईल. अशारितीने या तीन वर्षात राज्यातील चाळीस हजार तलाव पुनरुज्जीवीत करावयाचे आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची उदाहरणेही सांगितली. ते म्हणाले की, अशा योजनांतून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा, गरीबी निर्मूलनाचा प्रयत्न आहे. पाणी हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपले पाणी आपण साठविण्याची गरज निर्माण झाली आहे. यात मोठ्या प्रकल्पांऐवजी विशेषत्वाने छोट्या कामांवर भर द्यावा लागेल, हे अधोरेखीत झाले. खरेतर पाण्यासाठी काम करणे हे एक राष्ट्रकार्य आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांना लातूर हा जिल्हा राज्यातील बेघर मुक्त पहिला जिल्हा करा, असे आवाहन केले. या बेघर मुक्त उद्दिष्टासाठी जिल्ह्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमीही त्यांनी दिली.
आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळोवेळी विविध यंत्रणांना विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत निर्देश दिले, तसेच राज्य शासनाच्या त्याविषयीच्या विविध प्रयत्नाची माहिती दिली.
उल्लेखनीय कामांबाबत अधिकाऱ्यांचे अभिनंदन
जलयुक्त शिवार अभियानातील कामे वीस जुनपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. यासाठी कामांची सांगड घाला. मागेल त्याला शेततळे योजनेतील निधीची सांगड रोहयोशी घाला. महावितरण आपल्या दारी योजनेतील त्रुटी दूर करुन, पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जुलैपूर्वी नागरी महाराष्ट्र हागणदारीमुक्त करावयाचा आहे. त्यानंतर दोन ऑक्टोंबरपूर्वी पूर्ण राज्य हागणदारीमुक्त करावयाचे आहे. मराठवाडयामुळे महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम मागे आहे. त्यामुळे जुलैपुर्वी काम पूर्ण करून, दोन ऑक्टोबर रोजी राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी तयार रहा, अशी सूचना त्यांनी केली.
हागणदारीमुक्तीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल देवणी, जळकोट, शिरुर-अनंतपाळ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचे, तसेच अहमदपूर, उदगीर आणि निलंगा, औसा नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गायरान जमीन देता येत नाही. परंतु इतर सरकारी जमिनीचा वापर करा किंवा खासगी जमीन विकत घ्या. पण सगळ्यांना घर मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करा. बेस लाईन सर्व्हेतील बारा हजार लोकांची नोंदणी करा. त्यांच्यासाठी जमीन उपलब्ध आहे, की नाही याचा आढावा घ्या. त्यानंतर मिशन मोडमध्ये इतरांसाठी प्रयत्न करु. यात लोकप्रतिनिधीही एका-एका प्रकरणात लक्ष घालून, जिल्हा प्रशासनापर्यत ही प्रकरणे आणावीत आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी, घरे वेळेवर बांधून पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
प्रत्येक जिल्ह्यात एक हजार किमीचे रस्ते.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 30 हजार किलोमीटर्सचे रस्ते करावयाचे आहेत, त्यामध्ये एका जिल्ह्यात किमान एक हजार किलोमीटर्सचे रस्ते होतील. यात नवतंत्रज्ञानातून प्रीकास्ट पुलांची बांधणी करता येतील, का याचा विचार सुरु आहे. आता पर्यंत केलेल्या रस्त्यांचा दर्जा हा महामार्गांप्रमाणेच आहे. त्यामुळे हे रस्ते पुढे कित्येक वर्षांसाठी टीकून राहतील, असेही ते म्हणाले.
तूर खरेदी- शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी झालीच पाहिजे. पण त्यात व्यापाऱ्यांची तूर खरेदी होणार नाही याची दक्षता घ्या. मे अखेरपर्यंत तुरीची खरेदी करा. पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदीची सर्वंकष चौकशी करा. काटे वाढवा, मनुष्यबळ वाढवा, दोन पाळ्यांमध्ये खरेदी करा. एकतीस मे पर्यंत तूर खरेदी झालीच पाहिजे याकडे लक्ष द्या. एकतीस मे नंतर, खरेदीची पडताळणी करा. पेरणीचे क्षेत्र आणि उत्पादनाची पडताळणी करताना, जास्तीत जास्त दहा टक्क्यांची सूट द्या. पण त्यावरही दोषी आढळतील, त्यांना तुरुंगात पाठवा. उदगीर, निलंगा, देवणीमध्ये तूर खरेदी सुरु करा, थकलेले पैसे दहा दिवसांत दिले पाहिजेत, यासाठी नाफेडकडे पाठपुरावा करा, अशाही सूचना यावेळी श्री. फडणवीस यांनी दिल्या.
लातूर शहरातील पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने पाणी वितरण व्यवस्था अजूनही चांगली करा. त्यासाठी माहिती तंत्रज्ज्ञानाचा वापर करून, पाण्याचा हिशेबही मांडा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आमदार सुधाकर भालेराव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यापक दौऱ्याचे कौतूक केले. मुख्यमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
लातूर टँकरमुक्त करण्याच्या प्रयत्नाचे, जलयुक्त शिवार अभियानातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तळमळीच्या प्रयत्नांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजी-माजी पदाधिकारी, आमदार विनायक पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांचे आणि विविध विकास कामातील अडचणी समजून घेण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. पालकमंत्री श्री. पाटील-निलंगेकर म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातील कामांची फलनिष्पती आता दिसू लागली आहे. अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याने, लातूर जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती बदलल्याची स्थिती आहे. सरकारच्या सर्व योजना ग्रामस्तरापर्यंत नेण्यासाठी आम्ही सर्वचजण प्रयत्न करत आहोत. सरकारच्या सर्व योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात लातूर पॅटर्न निर्माण करु. लातूरच्या मागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहात, याची जाणीव आहे. खासदार डॅा. सुनिल गायकवाड, खासदार रविंद्र गायकवाड यांनीही विविध विकासकामांना मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.
विभागीय आयुक्त डॅा. भापकर यांनी मनरेगा, वृक्षारोपण यांसह गावा-गावांपर्यंत पोहचण्यासाठीच्या संपर्क अधिकारी नेमण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुरसळ यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध योजना, तसेच विकास कामांबाबतची तपशीलवार माहिती दिली. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. अनंत गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.
Post a Comment