मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
देशातील शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमुक्त करावे, अन्यथा प्रसंगी रक्त सांडू पण आता माघार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
आत्मक्लेश पदयात्रेचे आज लोणावळा शहरात आगमन झाले. ठिकठिकाणी शहरात उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. आज चौथा दिवस असून 72 किमी चे अंतर पार केले. कॉंग्रेस, शिवसेना, तसेच विविध मंडळाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, मोदी सरकारने तीन वर्षात शेतकऱ्यांना फसविण्याचा उद्योग केला आहे. आम्ही सरकारला मतदान करून चूक केली आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली असून त्याचेच प्रायश्चित्य घेत ही आत्मक्लेश यात्रा काढलेली आहे. मुंबईत राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार आहोत. शेतकऱ्यांना आता तुम्ही जमेत धरू नका. धनदांडग्यां पुढाऱ्यांना शेतकऱ्यांची काळजीच उरलेली नाही. शेतकरी मरतो आहे. तरीही सरकारने गेंड्याची कातडी अंगावर पांघरलेली आहे. 30 मे रोजी सरकारवर आसूड उगारणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. मांडीला मांडी लावून राज्य करण्याची भाषा करणारे नेत्यांची भाषाच बदललेली आहे. गेल्या तीन वर्षात शेतीमालाचे भाव पाडण्यात आलेत. याला केंद्र आणि राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. आमचा बाप कर्जात मेला, निदान आमची मुले तरी नीट जगू देत, ही शेतकऱ्यांची भावना आहे. मुंबईत गेल्यावरच आमच्या पुढील आंदोलनाची घोषणा होईल, त्यावेळी ती आरपारची लढाई असणार आहे. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले, आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती घेणारच. मुंबईत सर्व पक्षांच्या लोकांनी या मोर्चात सामिल व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, देवेंद्र भुयार, माणिक कदम, हंसराज वडगुले, राहूल मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment