* गावकऱ्यांकडून गाळाचा शेतात वापर
* डोब तलाव गाळमुक्तीचा संकल्प
* यावर्षी शंभर तलाव गाळमुक्त करणार
राज्य शासनाने नुकतेच गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना सुरु केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभही यवतमाळ येथूनच झाला. योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील शंभर तलाव गाळमुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाने केला असून त्यानुसार ठिकठिकाणी गाळ काढून शेतशिवारात टाकल्या जात आहे. दारव्हा तालुक्यातील लाखखिंड गावा शेजारी असलेल्या डोब सिंचन तलावाला भेट देवून जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, पंचायत समितीचे उपसभापती पंडीत राठोड, अनिकेत संस्थेचे अध्यक्ष रविंद्र राऊत, रंजीत बोबडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील 458 तलाव धरणांमधील गाळ काढण्यात येणार आहे. हा गाळ शेतकऱ्यांना रॉयल्टीमुक्त असून तो शेतकऱ्यांकडून आपल्या शेतात टाकला जाणार आहे. यावर्षी शंभर तलाव या अभियानांतर्गत घेण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
हा गाळ शासनाच्यावतीने मशिन लावून काढून दिला जात असून शेतकऱ्यांना रॉयल्टीमुक्त असून त्यांना फक्त आपल्या शेतात घेवून जावा लागत आहे. लाखखिंड गावाशेजारी डोब सिंचन तलावातील गाळ काढण्याचे काम जोरात सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी तलावास भेट देवून पाहणी केली. या तलावामध्ये अंदाजे पाच हजार घन मिटर इतका गाळ आहे. सन 2015-16 मध्ये 3 हजार 484 घन मिटर गाळ शेतकऱ्यांनी काढून आपल्या शेतात टाकला होता.
गाळाचे अनेक फायदे आहे. मुरमाळ व गोटाळ जमीनीत गाळ टाकल्यास नापिक जमीनही सुपीक करता येते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होतोच शिवाय शेतजमीनीचे सुपीकतेमुळे भावही वाढत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. गावकऱ्यांनी येत्या 10 जुनपर्यंत तलावातील सर्व गाळ आपल्या शेतात नेवून टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर गोकी धरणातील गाळ उपसाची पाहणी सुध्दी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
शेतकऱ्याने टाकला एक फुटाचा गाळाचा थर
लाखखिंड गावाशेजारी असलेल्या डोब सिंचन तलावाजवळ धोंडबा कोळप हे शेतकरी व त्यांच्या कुटूंबियांची साडे बाविस एकर शेतजमीन आहे, परंतु जमीन मुरमाळ व हलकी असल्याने एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न त्यांना व्हायचे. गेल्या तीन वर्षात त्यांनी सातत्याने तलावातील गाळ आपल्या शेतात टाकला. पहिल्या वर्षी 700 ट्रॉली, दुसऱ्या वर्षी 1100 ट्रॉली व यावर्षी 2000 ट्रॉली गाळ टाकून आपल्या संपूर्ण शेतात त्यांनी गाळाचा एक फुटाचा थर टाकला. गेल्यावर्षी या गाळामुळे उत्पन्न तिप्पट झाले असल्याचे यावेळी धोंडबा कोळप यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
छत्र हरवलेल्या युवकास गावकऱ्यांची अशीही मदत
लाखखिंड येथील युवक अमोल गुलाबराव राठोड याचे काही दिवसांपूर्वी मातृ व पितृ असे दोनही छत्र हरवले वयाने कमी असलेल्या या युवकाप्रती गावकऱ्यांनी सहानुभुती दाखवत त्याच्या शेतात लोकवर्गनीतून तलावातील तब्बल 50 ट्रॉली गाळ टाकला. विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालकांनी हा गाळ विनामुल्य शेतात पसरवून दिला. या सामाजिक कार्याप्रती जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे कौतूक केले. या युवकास महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने येत्या खरीप हंगामासाठी विनामुल्य बि-बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Post a Comment