रामनाथी- - ११ ऑक्टोबर २०१६ या दिवशी
सनातनच्या रामनाथी आश्रमावर सायंकाळी ६.३० च्या कालावधीत आश्रमावर ड्रोन
(मानवरहित उडता कॅमेरा) फिरतांना दिसला. जमिनीपासून साधारण ७०-८० फुटांवर
तो फिरत होता. श्री रामनाथ देवस्थानाच्या दिशेने सनातन आश्रमाकडे येत
असलेला हा ड्रोन साधारण २० मिनिटे फिरत होता. याविषयी सनातन आश्रमाच्या
वतीने त्वरित १०० क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना माहिती देण्यात आली,
तसेच फोंडा पोलीस ठाण्यातही कळवण्यात आले. त्यानंतर सुमारे अर्ध्या
घंट्याने पोलीस आश्रमात पोचले आणि त्यांनी याविषयी जाणून घेतले. याविषयी १२
ऑक्टोबर या दिवशी आश्रम व्यवस्थापनाच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात लेखी
तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री श्री.
लक्ष्मीकांत पार्सेकर, स्थानिक आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.
सुदिन ढवळीकर आणि पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
या तक्रारीत म्हटले आहे की, नुकतेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय
सैन्याने आतंकवाद्यांची जवळपास ८ स्थळे नष्ट केली. यावर पाकिस्तानची
मोठ्याप्रमाणावर हानी झाली असली किंवा मानसिक खच्चीकरण झाले असले, तरीही
आतंकवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान निश्चितच शांत बसणार नाही. याच
अनुषंगाने सध्या मोठमोठ्या शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अतीदक्षतेची
चेतावणीही देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यामध्ये आतंकवादी
कारवाया होत असल्याचे उघडकीस आले आहे. गोव्याची शांतता आणि सुव्यवस्था
अबाधित राखण्यासाठी संशयास्पद घटनांकडे गांभीर्याने आणि सतर्कतेने पहाणे
क्रमप्राप्त आहे. याच दृष्टीने सनातन आश्रमावर फिरतांना आढळलेल्या
ड्रोनकडेही तितक्याच गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
सनातन संस्था धर्मादाय न्यास असून सांप्रदायिक एकता आणि सामाजिक बंधुत्व
हा उद्देश समोर ठेवून अध्यात्मप्रसार तसेच समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि
धर्मजागृती यांविषयी कार्यरत आहे. अशा प्रकारे एका राष्ट्रप्रेमी अन्
धर्मप्रेमी कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या संस्था किंवा संघटना यांवर
लक्ष ठेवून आतंकवादी कारवाया करण्याचे कुटील षड्यंत्र यामागे असण्याची
तीव्र शक्यता नाकारता येत नाही. हा ड्रोन कोणाचा होता ? कशासाठी फिरत होता ?
पोलिसांच्या अनुमतीशिवाय फिरत होता का ? याविषयी सखोल चौकशी आवश्यक आहे.
तरी या प्रकरणी तत्परतेने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही विनंती !
Post a Comment