Thursday, May 25, 2017
जिल्हयाला 7 लक्ष 68 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट - जिल्हाधिकारी
Posted by vidarbha on 8:05:00 AM in | Comments : 0
भंडारा - जागतिक स्तरावर उष्णतेत सातत्याने होत असलेली वाढ, हवामान व ऋतुबदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच दुर्भिक्ष यावर मात करण्यासाठी व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. ही बाब जागतिकस्तरावर मान्य झाली आहे. वातावरणी कार्बन डाय ऑक्साईड शोषून नैसर्गिक प्रक्रीयेने ऑक्सीजन उत्पन्न करणारे एकमेव यंत्र म्हणजे वृक्ष तथापी असंतुलीत विकासासाठी निर्वणीकरण व वृक्षतोडीमुळे वृक्षाच्छादनाचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. यासाठी शासनाने सन 2017 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी जिल्हयाकरीता 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधी 7 लक्ष 68 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप वनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने 1 जुलै 2017 रोजी राज्यभर वृक्ष लागवड योजना हाती घेतली असून राज्यात एकाच दिवशी मोठया प्रमाणात वृक्ष लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. भंडारा जिल्हा प्रशासन व वनविभागाने यासाठी खास मोहिम हाती घेतली असून भंडारा जिल्हयात 7 लक्ष 68 हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या 20 टक्के वनक्षेत्र असून ते राष्ट्रीय वन नितीनुसार 33 टक्क्यांपर्यत वाढविण्याचा शासनाचा मानस आहे. या वर्षी म्हणजे 2017 ला 4 कोटी, 2018 ला 13 कोटी आणि 2019 ला 33 कोटी असे तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा राज्याच्या वन विभागाचा मानस आहे.
जिल्हयातील सर्व कामांची माहिती स्थळ, छायाचित्र आणि रोप लावण्यासाठी केलेल्या खड्डयांच्या अक्षांश रेखांशसह ऑनलाईन स्वरुपात वन विभागाच्या संकेतस्थळावर भरायचे आहे. मोहिम पारदशी्रपणे राबविण्याबाबत सुनिश्चिती करण्यासाठी रोपवन स्थळ, रोपवाटिका स्थळ तसेच लावण्यात येणाऱ्या रोपाची स्थिती ऑनलाईन पध्दतीने संनियंत्रित केली जात आहे. यासाठी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर वनयुक्त शिवारच्या लिंकवर याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
अधिकारी व कर्मचारी यांना ग्रीन आर्मीचे सदस्य बनवून प्रत्येकांना 5 वृक्ष लावण्यास व त्याचे संगोपन करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच 4 थी ते 9 वी च्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रीन आर्मीचे सदस्य बनवून त्यांना वृक्ष लावून तीन वर्ष त्याचे संगोपन करण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम विद्यार्थ्यांना बक्षीस व शालेय संस्थांना सुध्दा बक्षिस देण्याची योजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ग्रीन आर्मीमध्ये आतापर्यंत 51 318 सदस्यांची नोंदणी करण्यात आल्याचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांनी सांगितले. माटोरा येथे खासदारांच्या हस्ते वृक्षारोपण होणार असून रोप आपल्या दारी हा नवीन उपक्रम शासन राबविणार आहे. त्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीस 5 झाडे मोफत घरपोच मिळणार आहेत. तसेच उप वनसंरक्षक कार्यालयात आयटी सेल कार्यान्वित करण्यात आलाअसून यावर ऑनलाईन माहिती आपण भरु शकतो, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात सर्व जनतेनी तसेच सामाजिक, संस्था यांच्यासह इतरही संस्था यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे व उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांनी केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment