एका लाखाच्या धाडसी चोरीच्या तपासात चांदुर रेल्वे पोलीसांची हयगय
स्थानिक गाडगेबाबा मार्केटमधील अरीहंत ज्वेलर्सचे संचालक कमलचंद गुगलीया यांच्या धनराज नगरातील घरी बुधवार ७ जुनच्या मध्यरात्री १ लाखाची धाडसी चोरी झाली. या धाडसी चोरीच्या तपासात चांदुर रेल्वे पोलीसांनी हयगय केली असुन ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांनी तक्रारकर्ते जेष्ठ नागरीकाला उध्दट वागणुक दिल्याची तक्रार पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याकडे केली आहे.
धनराज नगरमधील कमलचंद गुगलीया यांच्या घराचे दार तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील झोपलेल्या सर्व मंडळींना बेशुध्द केले. यानंतर घरातील कपाट उघडुन सोनसाखळी १५ ग्रैम, अंगठ्या १० ग्रैम, कानातले असा ८३ हजार रूपयांच्या ऐवजासह नगदी २१ हजार लंपास केले. अशी एकुन १ लाख ४ हजारांची चोरी झाली. या चोरीची तक्रार कमलचंद गुगलीया यांनी सकाळी दिली. यावेळी ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांनी या चोरीच्या प्रकरणी त्वरीत कारवाई करण्याऐवजी तक्रारकर्ते जेष्ठ नागरीक गुगलीया यांचीच उलटतपासणी सुरू केली. ऐवढेच नव्हे तर तक्रारकर्त्यांच्या लहान भावाला बोलावुन त्यांच्या नावाने वेगळा रीपोर्ट लिहुन घेतला. प्रथम चोरीची घराचा कर्ता प्रमुख या नात्याने रीपोर्ट दिल्यानंतरही ठाणेदारांनी दुसरा रीपोर्ट का लिहुन घेतला यावर गुगलीया यांनी आक्षेप घेतला. त्यावर ठाणेदारांनी तक्रारतर्त्यालाच दमदाटी केली व पोलीस स्टेशनमधुन बाहेर काढले. यानंतर पत्रकार मंडळींनी एसडीपीओ राऊत यांच्याशी संपर्क साधुन याबाबत माहिती दिल्यानंतर चोरीच्या तपासात वेग आला. त्यानंतर फिंगर प्रिंट एक्सपर्ट व डॉग स्कॉडला घटनास्थळी बोलाविले. ठाणेदार शेळके यांच्या उध्दट वागणुकीमुळे व चोरीच्या प्रकरणामुळे तक्रारकर्त्याच्या घरची मंडळी धास्तावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुरक्षेची हमी द्यावी व उध्दट वागणुक देणारे व चोरीच्या गुन्हाच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या ठाणेदार शेळकेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी कमलचंद गुगलीया यांनी चांदुर रेल्वे दौऱ्यावर नुकतेच आलेले पालकमंत्री प्रविण पोटे यांना निवेदन देऊन केली आहे.
प्रविण पोटेंनी केली ठाणेदाराची कानउघडणी
पालकमंत्री पोटे नुकतेच चांदुर रेल्वे दौऱ्यावर आले होते. याच दरम्यान गुगलीया यांनी पोटेंना निवेदन दिले. यानंतर झालेल्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत प्रविण पोटेंनी ठाणेदार शेळके यांना चांगलेच धारेवर धरले होते. व ठाणेदार शेळकेंची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते..
Post a Comment